अमित शाहा करणार महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादात मध्यस्थी, बोम्मई आणि शिंदेंशी करणार चर्चा

०९ डिसेंबर २०२२


महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मध्यस्थी करणार आहेत. अमित शाह येत्या १४ डिसेंबर रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी सीमावादावर चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर शाह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे यांनी दिली.

आज महाराष्ट्रातील खासदारांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेवून कर्नाटक सरकार कडून सीमा भागातील तणावाबद्दल माहिती दिली. त्यानंतर शाह यांनी चर्चेचे आश्वासन दिल्याचं असं खासदार कोल्हे यांनी सांगितलं. कर्नाटक सरकारचे हिवाळी आधिवेशन १९ डिसेंबरपासून बेळगाव येथे सुरू होणार आहे, तर महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे १९ डिसेंबरलाच या अधिवेशनाच्या निषेधार्थ मराठी भाषिकांचा मेळावा आयोजित केला जाणार आहे. आणि या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधक पक्षातील प्रतिनिधींना मेळाव्यासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे.