पुणे महापालिकेचे विभाजन करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय; फुरसुंगी-उरुळीसाठी नवीन नगरपालिका

०७ डिसेंबर २०२२


भौगोलिकदृष्ट्या राज्यातील सर्वांत मोठी महापालिका बनलेल्या पुणे महापालिकेतून उरळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे वगळण्याचा धक्कादायक निर्णय मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या दोन्ही गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे आदेश मुख्यमंत्री, तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

पुणे महापालिकेच्या हद्दीलगतच्या उरळी आणि फुरसुंगी या दोन गावांसह आणखी नऊ अशा ११ गावांचा समावेश ऑक्टोबर २०१७ मध्ये महापालिकेत करण्यात आला होता. पालिकेतील समावेशानंतर येथे गेल्या पाच वर्षांत विविध विकासकामांना गती देण्यात आली होती. पालिकेच्या नियमांनुसार येथून मिळकतकर वसूल करण्यास सुरुवात झाली होती. मात्र, पालिकेतर्फे पुरेशा सुविधा दिल्या जात नसताना मोठ्या प्रमाणात कर घेतला जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर माजी मंत्री विजय शिवतारे यांनी या गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्याचबरोबर मिळकतकर कमी करण्याची मागणीही लावून धरली होती. या पार्श्‍वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मुंबईत घेतलेल्या बैठकीत दोन्ही गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका करण्याचे ठरविण्यात आले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *