०३ डिसेंबर २०२२
पुणे
डासांपासून पसरणारा झिका विषाणूचा रुग्ण पुण्यात आढळल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून पुणे शहर तसेच बावधन परिसरात ताप रुग्ण सर्वेक्षण अधिक वेगवान करण्यात आले आहे. महापालिकेच्या वतीने बावधन भागात रोग नियंत्रण उपाययोजना करण्यात आल्या आहेत. रुग्णाच्या परिसरातील घरांचे सर्वेक्षण करण्यात आले, मात्र त्यात एकही संशयित रुग्ण आढळला नाही. या भागात डासोत्पत्तीसाठी घरोघर सर्वेक्षण, कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले.
या भागात एडिस डासाची उत्पत्ती आढळून आलेली नाही.
झिका हा डेंग्यू, चिकुनगुनियाप्रमाणेच डासांपासून एकापासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरणारा विषाणू आहे. याची बाधा गरोदर महिलांना झाल्यास जन्माला येणाऱ्या मुलांवर त्याचा परिणाम दिसतो. यामुळे मेदूंची वाढ अपुरी होते. यामध्ये मुलांचे डोके प्रमाणापेक्षा लहान होणे, त्याला गुलियन बॅरे सिंड्रोम होणे, मज्जातंतूविषयक आजार होणे ही लक्षणे दिसू शकतात.