पुण्यात आढळला जपानी मेंदूज्वराचा रुग्ण

०२ डिसेंबर २०२२

पुणे


पुणे शहरात प्रथमच ‘जॅपनीज इन्सेफेलायटीस’ (जेई) अर्थात मेंदूज्वरचा रुग्ण आढळला आहे.  एका चार वर्षाच्या मुलाला या आजाराची बाधा झाली आहे. सध्या त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुणे महापालिकेच्या क्षेत्रात पहिल्यांदाच या आजाराचा रुग्ण आढळला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे त्याला रोखण्यासाठी पलिकेकडून तयारी सुरु करण्यात आली आहे.

‘जेई’ ची बाधा झालेल्या वडगाव शेरी येथील चार वर्षांच्या बालकावर ३ नोव्हेंबरपासून ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्यानुसार आरोग्य विभागाकडून रुग्णाच्या परिसरातील ताप व डासांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या आजारामध्ये रुग्णाच्या मेंदूला सूज येते. ताप, डोकेदुखीही असते. त्याचा प्रभाव १ ते १५ वर्षांच्या वयोगटांतील बालकांमध्ये जास्त आढळतो. प्रमुख्याने विदर्भात त्याचे रुग्ण आढळून येतात.या बालकाला नोव्हेंबरच्या सुरुवातीला ताप व डोकेदुखी अशी लक्षणे होती. ताप वाढून त्याला तापाचा झटका आला. त्यात त्याचा एक हात व पाय कमकुवत झाला. त्याला सुरुवातीला खासगी व नंतर ससून रुग्णालयात पाठविले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *