राज्यातील ४१२२ तलाठी पदांची होणार भरती

०२ डिसेंबर २०२२

पुणे


महसूल विभागामार्फत राज्यातील तलाठी पदाच्या चार हजार १२२ पदांची भरती लवकरच होणार आहे. त्यामध्ये रिक्त असलेल्या एक हजार १२ आणि नव्याने निर्माण करण्यात आलेल्या तीन हजार ११० या पदांचा समावेश आहे. त्याबाबतची कार्यवाही महसूल विभागाकडून सुरू करण्यात आली असून येत्या पंधरा दिवसांत जिल्हानिहाय माहिती पाठविण्याचे निर्देश राज्याचे कार्यासन अधिकारी श्रीकांत मोहिते यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहेत.महसूल विभागाअंतर्गत असलेल्या तलाठ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे सध्या तीन ते चार गावांसाठी एक तलाठी अशी सद्य:स्थिती आहे. परिणामी गावातील कामांवर, लोकांना मिळणाऱ्या सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.

तलाठ्यांची रिक्त पदे भरण्याची मागणी राज्य तलाठी संघाच्यावतीने शासनाकडे अनेकदा करण्यात आली होती. राज्यातील महसुली विभागातील नाशिक विभागात १०३५, औरंगाबाद विभागात ८४७, कोकण विभागात ७३१, नागपूर विभागात ५८०, अमरावती विभागात १८३ तर पुणे विभागात ७८६ अशा एकूण ४१२२ पदांची भरती लवकरच सुरू होणार आहे. त्याबाबतची कार्यवाही महसूल विभाकडून सुरू करण्यात आली असून प्रत्येक विभागीय आयुक्तांकडून जिल्हानिहाय तपशील सादर करण्यास शासनाने सूचित केले आहे. त्याचबरोबर मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू नामावली प्रमाणित करुन त्यासंदर्भातील सामाजिक आरक्षण, समांतर आरक्षणाचा तपशीलही जिल्हानिहाय मागवण्यात आला आहे. त्यामुळे आता सुशिक्षित तरुणांना नोकरीची चांगली संधी मिळणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *