आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चर्चेचे आव्हान

३० नोव्हेंबर २०२२


‘वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्पाला दिलेल्या सवलती आणि राज्यात प्रकल्प उभारण्याबाबत सामंजस्य करार करण्याविषयी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पाठवलेले व माहितीच्या अधिकारात प्राप्त केलेले पत्र जाहीर करीत हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता हे त्यावरून सिद्ध होत असल्याचा दावा शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी केला. तसेच शिंदे-फडणवीस सरकारमुळेच हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचे स्पष्ट होते. यावर वस्तुस्थिती समोर यावी म्हणून जाहीर चर्चा करावी, असे आव्हान ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.

आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर अनेक आरोप केले. ते म्हणाले की, वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प एकनाथ शिंदे यांच्या सरकारमुळेच गुजरातला गेला. एकनाथ शिंदें हे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. त्यांना उद्योग गुजरातमध्ये गेले, त्यावरून काही बोलायचंच नाही. यावेळी आदित्य ठाकरे यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या माहितीचा संदर्भ देत शिंदे यांच्यावर आरोप केलेत.

घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांमुळे महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये गेलेत. या विषयावर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी माध्यमांसमोर माझ्याशी १० मिनीटं चर्चा करावी, असं खुलं आव्हान आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिलं. मुळात मुख्यमंत्र्यांना प्रकल्पाबाबत माहित होतं का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी माहिती अधिकारात मिळालेलं पत्र वाचून दाखवलं. दरम्यान आम्ही ब्लेम गेम करत नसून तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. जी गुंतवणूक आपल्या राज्यात येणार होती, ती दुसरीकडे पाठवण्यात आली, याचा पुरावा मिळाल्याचं आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *