आयुक्तसाहेब वेळीच सावध व्हा!; पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात स्वतंत्र गोवर आयसोलेशन कक्ष सुरू करा – आमदार लक्ष्मण जगताप

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२५ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


गोवर या संसर्गजन्य रोगाचा बालकांमध्ये लागण होताना दिसत आहे. मुंबई व अन्य शहरांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्येही खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात स्वतंत्र गोवर आयसोलेशन कक्ष तातडीने तयार करण्याची सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना केली आहे. तसेच डेंग्यू आजाराने शहराला विळखा घातलेला असल्यामुळे त्याला आळा घालण्यासाठीही आरोग्य आणि वैद्यकीय विभागामार्फत तातडीने उपाययोजना राबवण्यासही त्यांनी आयुक्तांना सांगितले आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “सध्या मुंबई व ठाण्यामध्ये तसेच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी गोवर आजाराचे असंख्य लहान बालक आढळून येत आहेत. आता पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातही या आजाराने डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. गोवर हा वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे आपल्या शहरातही हा आजार मोठ्या प्रमाणात पसरल्यास अनेक लहान बालकांच्या जिवाला धोका ठरू शकतो. या आजाराबाबत निष्काळजीपणा करून चालणार नाही.

गोवर या आजारावर अद्याप कोणतेही औषध नाही. लस देणे हा एकमेव पर्याय आहे. तसेच गोवर झाल्यानंतर केवळ त्याची लक्षणे नियंत्रित करून उपचार केले जातात. याला प्रतिबंध घालण्यासाठी व रोगाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे या रोगाला तातडीने प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात स्वतंत्र गोवर आयसोलेशन कक्ष तयार करण्याची नितांत गरज आहे. त्याची प्रशासनाने लवकरात लवकर अंमलबजावणी करावी. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून प्रशासनाने गोवर आयसोलेशन कक्ष तयार करून त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामुग्री उपलब्ध करण्याची दक्षता घ्यावी.

त्याचप्रमाणे शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. या आजाराने संपूर्ण शहरालाच विळखा घातले आहे. या आजारालाही पायबंद घालण्यासाठी आरोग्य आणि वैद्यकीय विभागामार्फत विशेष उपाययोजना करण्यात यावी. संपूर्ण शहरात औषधांची फवारणी करण्यात यावी. त्याचप्रमाणे डेंग्यू आजाराबाबत पुरेश जनजागृती करून नागरिकांनाही स्वच्छतेबाबत जागृत करावे. आधीच कोरोनामुळे त्रस्त होऊन त्यातून कसेबसे सावणाऱ्या नागरिकांना संसर्गजन्य आजारांनी पुन्हा त्रस्त केले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तशी ती घेण्यात यावी, अशी सूचना त्यांनी केली आहे.”


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *