लघुउद्योग संघटनेच्या कार्यालयासाठी जागेचा प्रश्न सुटला!

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२३ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कार्यालयासाठीच्या जागेचा प्रश्न अखेर सुटला आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी औद्योगिक महामंडळाच्या हद्दीतील भूखंड संघटनेच्या कार्यालयासाठी उपलब्ध करुन द्यावा, असे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पिंपरी-चिंचवडमधील एका कार्यक्रमाला उपस्थित लावली होती. त्यावेळी १५ दिवसांत पुन्हा शहराचा दौरा करून उद्योगांच्या मागण्यांबाबत चर्चा करणार, अशी ‘‘कमिटमेंट’’ त्यांनी दिली होती. दिलेला शब्द पूर्ण करीत उद्योगांच्या समस्यांबाबत येत्या बुधवारी होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासनही उद्योगमंत्री सामंत यांनी दिले आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत यांचे प्रशासनाला आदेश

पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचा मेळावा मोशी येथे उत्साहात पार पडला. यावेळी उद्योजकांनी विविध समस्या आणि मागण्या उद्योगमंत्र्यांसमोर मांडल्या. यावेळी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, जयंत कड, संचालक संजय सातव, संजय जगताप, विनोद नाणेकर, तात्या सपकाळ, सुरेश तात्या म्हेत्रे, प्रविण लोंढे, संजय ववले, विजय खळदकरआणि पदाधिकारी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेची स्थापना दि. २४ ऑक्टोबर १९८० रोजी झाली आहे. गेल्या ४२ वर्षांपासून ही संघटना उद्योगांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत आहे. पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील सुमारे ४ हजार उद्योजक या संघटनेचे सभासद आहेत. सध्या चिंचवड येथील थरमॅक्स चौक येथे संघटनेचे छोटे कार्यालय आहे. संघटनेच्या कामकाजाकरिता सदर कार्यालयाची जागा अपुरी पडत असून, औद्योगिक महामंडळाच्या हद्दीतील सुमारे १ हजार चौरस फूट जागा संघटनेच्या कार्यालयाकरिता विनामूल्य उपलब्ध व्हावी, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली होती.

मोशी येथे लघुउद्योग संघटनेचा मेळावा उत्साहात

पिंपरी-चिंचवड महापालिका औद्योगिक परिसर आणि चाकण औद्योगिक पट्टयातील उद्योगांच्या समस्या मांडण्यात आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने वीज समस्या, शास्तीकर, रेड झोनमधील पायाभूत सुविधा, भूयारी गटार योजना व सी.इ.टी.पी.प्लांट, कचरा समस्या, अग्निशमन केंद्र, बस सुविधा, अनधिकृत झोपड्या व भंगार दुकाने,  वाहतूक कोंडी यासह महापालिका प्रशासनाकडून अपेक्षीत असलेल्या पायाभूत सोयी-सुविधा याबाबत मेळाव्यात चर्चा करण्यात आली. तसेच, सह्याद्री स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित या महिलांच्या संस्थेला चाकण औद्योगिक क्षेत्र टप्पा क्र. २ या भूखंडावरील बांधकामाबाबत शेतकऱ्यांकडून होणाऱ्या अडथळ्याबाबत तोडगा काढण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली जाईल, असे आश्वासनही उद्योगमंत्री सामंत यांनी दिले आहे.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, लघुउद्योगांच्या समस्या सोडवण्यासाठी पहिल्यादा राज्याचे उद्योगमंत्री पिंपरी-चिंचवड शहरात आले. अनेक नेत्यांनी आणि मंत्र्यांनी केवळ बैठका आणि मोठ्या कंपन्यांचे भूमिपूजन केले. परंतु, प्रश्न सुटले नाही. सर्वाधिक महसूल देणारे लघुउद्योग मात्र वंचित राहीले. महापालिका आणि राज्य सरकारकडे आम्ही पाठपुरावा केला. कोविड काळात लघुउद्योजकांनी कर्ज काढून कामगारांना जपले. पण, वीजबिल भरले नाही, म्हणून महाविकास आघाडीच्या काळात लघुउद्योजकांची वीज कनेक्शन तोडले. आता राज्यात सत्ताबदल झाला आहे. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा महायुतीच्या सत्ताकाळात लघुउद्योगांसह शहरातील सर्वसामान्य नागरिकांवर लादलेला शास्तीकर सरसकट रद्द करण्याबाबत निर्णय घ्यावा, असे आवाहनही आमदार लांडगे यांनी केले.

प्रतिक्रिया:
छोटा उद्योजक हा मोठ्या उद्योगांचा पाया आहे. विकासाची ही दोन्ही चाके समान चालली पाहिजेत. उद्योग संघटनेच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. उद्योगांच्या वीज तोडणीबाबत नियमावली कडक करण्यात येईल. तसेच, उद्योगांच्या मागण्यांबाबत कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. आवश्यक पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत महायुती सरकार कटीबद्ध आहे. उद्योग कोणामुळे राज्याबाहेर गेले, याबाबत आम्ही श्वेतपत्रिका काढण्यात येणार आहे. शास्तीकर, मिळकत कर, रेडझोन बाबतच्या समस्यांबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करण्यात येईल.
– उदय सामंत, उद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य.

प्रतिक्रिया :
शहरातील उद्योग आणि उद्योजक दोन्हीमधला दूवा म्हणजे लघुउद्योग संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून गेल्या ४२ वर्षांपासून विविध मुद्यांवर लघुउद्योगांच्या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. संघटनेकरिता प्रशस्त कार्यालय उपलब्ध व्हावे, अशी पदाधिकाऱ्यांची मागणी होती. त्याबाबत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा केला होता. संघटनेच्या मेळाव्याच्या निमित्ताने उद्योग मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे लघु उद्योग संघटनेचे प्रशस्त कार्यालय उभारण्याच्या कामाला गती मिळेल. तसेच, वीज समस्या, शास्तीकर यासह विविध समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
– महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *