निवडणुका जाहीर झाल्या तर आम्ही ताबोडतोब एकत्र येऊ; ठाकरे गटाशी युतीबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

२१ नोव्हेंबर २०२२


वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज एकाच मंचावर उपस्थित होते. मुंबईत प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाच्या उद्धाटनाप्रसंगी दोन्ही नेते एकत्र आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी भाषण केलं असून एकमेकांच्या कामाचं कौतुक केलं.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्रातील सध्याचं सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या ‘स्टे ऑर्डर’वर सुरू आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला आमची विनंती आहे की, स्थगितीच्या याचिकेवर तातडीने निर्णय घ्यावा. कारण हे महाराष्ट्राच्या हिताचं आहे, असं मी मानत नाही. राहिला प्रश्न आम्ही एकत्र येण्याचा तर राज्यात निवडणुका कधी लागू होणार? यावर ते अवलंबून आहे. ताबोडतोब निवडणुका जाहीर झाल्या तर आम्ही ताबोडतोब एकत्र येऊ, नंतर निवडणुका जाहीर झाल्या तर आम्ही नंतर एकत्र येऊ.

उद्धव ठाकरे यांनीही वंचित बहुजन आघाडीसोबत युतीचे संकेत दिले आहेत. या कार्यक्रमात केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले, लोकांना नुसतं जागं करून काहीही उपयोग नाही. आपण पुढे काही करणार नसू तर लोकं झोपलेलीच बरी आहेत. त्यांना तसंच झोपू द्यायला हवं. त्यांचा निद्रानाश करायला नको. कारण झोपेत असताना किमान काय सुरू आहे? ते तरी त्यांना कळणार नाही. आपण त्यांना जागं करून त्यांना कुठेतरी नेऊन सोडणार असू तर ते काम आपण न केलेलं बरं… आणि ते काम आपण करू शकलो नाही, तर आपल्या दोघांनाही आपल्या आजोबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही” अशा आशयाचं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *