‘सिनेट’ निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमधील मतदान निर्णायक राहील – आमदार महेश लांडगे

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१६ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘सिनेट’ निवडणुकीत पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील मतदार विद्यापीठ विकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांच्या पाठिशी ठामपणे उभे राहतील. त्यामुळे या निवडणुकीत पिंपरी-चिंचवडकर मतदार निर्णायक ठरतील, असा विश्वास भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभेच्या पदवीधर निवडणूकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे. या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवडच्या वतीने शहराध्यक्ष तथा आमदार महेशदादा लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली ‘पुणे विद्यापीठ सिनेट’ निवडणुकीत ’विद्यापीठ विकास मंच’ पॅनलचे सर्व उमेदवार बहुमताने निवडूण यावे. या करिता भाजपा शहर कार्यालयात पक्षाचे सर्व माजी नगरसेवक, नगरसेविका व सर्व मंडल अध्यक्ष यांच्या बैठकीचे आयोजन केले होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट निवडणुकीची जोरदार तयारी

यावेळी पुणे विद्यापीठ विकास मंच सिनेट निवडणूकीचे समन्वयक राजेश पांडे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, उषा उर्फ माई ढोरे, सिनेट उमेदवार प्रसेनजीत फडणवीस, बागेश्री मंठाळकर, संतोष ढोरे, राहुल पाखरे, दक्षिण भारतीय आघाडीचे प्रदेश संयोजक राजेश पिल्ले, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, पिं.चि.नवनगर विकास प्राधीकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, भाजयुमोचे शहराध्यक्ष संकेत चौंधे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा उज्ज्वला गावडे आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड परिसरातील १० हजार मतदारांना केले आवाहन

आमदार महेश लांडगे म्हणाले की, विद्यापीठ विकास मंच पॅनेलचे सर्व उमेदवार उच्चशिक्षित आणि त्या-त्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या मतदारांनी प्रथम पसंतीचे मत संतोष ढोरे यांना आणि पुणे परिसरातील मतदारांनी प्रथम पसंतीचे मत प्रसेनजीत फडणवीस यांना द्यावे. यासह विद्यापीठ विकास पॅनेलच्या सर्वच उमेदवारांना निवडून आणण्यासाठी भाजपाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी संकल्प केला आहे.

उमेदवार संतोष ढोरे म्हणाले की, गेल्या १० वर्षांपासून सिनेट सदस्य म्हणून काम करीत आहे. विद्यार्थी आणि विद्यापीठ विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न मार्गी लावण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या हक्काचा प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. विद्यार्थ्यांची शुल्कमाफी, ऑनलाईन परीक्षा न देता आलेल्या विद्यार्थ्यांना पुन: परीक्षेची संधी, नवीन वसतीगृहाची मंजुरी, शिका व कमवा योजनेतील विद्यार्थ्यांना मानधनवाढ, विद्यापीठ आवारात २७ एकर जागेत क्रिडांगण विकसित करणे आदी विविध विधायक मुद्यांवर पाठपुरावा केला आहे. त्यामुळे मतदारांनी पुन्हा काम करण्याची संधी द्यावी.
– संतोष ढोरे, उमेदवार, विद्यापीठ विकास पॅनेल.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून महाविद्यालयीन जीवनापासून विद्यार्थ्यांसाठी काम करीत आहे. विद्यार्थी परिषदेच्या विविध आंदोलनामध्ये सहभाग घेतला आहे. २०१७ मध्ये पदवीधर गटातून ‘सिनेट’वर निवडून दिले व ‘सिनेट’मधून मॅनेजमेंट कौन्सिलवर बिनविरोध संधी मिळाली. त्यानंतर विद्यापीठाच्या विविध समित्यांवर काम केले आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा मतदारांनी शिक्षण क्षेत्र आणि विद्यार्थी हितासाठी विद्यापीठ विकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन करतो.
– प्रसेनजीत फडणवीस, उमेदवार, विद्यापीठ विकास मंच


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *