शहरातील बीआरटी बंद करणार नाही

१४ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


पिंपरी-चिंचवड शहरातील बीआरटीएस मार्गास प्रवाशांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे . बसची संख्या वाढविल्यानंतर प्रतिसाद आणखी वाढणार आहे . त्यामुळे शहरातील बीआरटीएस मार्ग बंद केले जाणार नाहीत , असा दावा महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाचे प्रमुख सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे यांनी केला आहे . पुणे शहरात वाहतुक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे . त्यामुळे काही मार्गावरील बीआरटी लेन काढून टाकून रस्ते मोठे करा , असे पत्र पुणे पोलिस आयुक्तांनी पुणे महापालिकेस दिले आहे . त्यामुळे शहरातील काही मार्गावरील बीआरटी मार्ग बंद करण्याची चर्चा सुरू झाली आहे त्यापार्श्वभूमीवर पिंपरी – चिंचवड महापालिकेची भूमिकेबाबत विचारले असता ते बोलत होते. सहशहर अभियंता ओंभासे म्हणाले की , भाविष्यात ४० वर्षांचा नियोजन करून पिपरी – चिंचवड शहरातील रस्ते प्रशस्त करण्यात आले आहेत . अनेक ठिकाणी उड्डाणपुल व ग्रेडसेपरेटर बनविण्यात आले आहे . शहरातील सर्व प्रमुख रस्ते एकमेकांना जोडण्यात आले आहेत . पालिकेने शहरात सांगवी ते किवळे , नाशिक फाटा ते वाकड , दापोडी ते निगडी , भक्ती – शक्ती ते रावेत , काळेवाडी फाटा ते चिखली , पुणे आळंदी असे बीआरटीएसचे सहा मार्ग विकसित केले आहेत . त्यातील पाच मार्ग सुरू असून , पुणे – आळंदी रस्त्यावरील बीआरटी लवकरच सुरू केला जाणार आहे.

बीआरटी मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद लाभत आहे . पुणे शहरापेक्षा शहरात बसचे उत्पन्न अधिक आहे . येथील बहुतांश मार्गावर प्रवाशांचा मोठा प्रतिसाद असतो . या मार्गावर बसची संख्या वाढविल्यास नागरिकांचा प्रतिसाद अधिक वाढणार आहे . त्याबाबत पीएमपीएलसोबत पत्रव्यवहार सुरू आहे . पुणे शहराप्रमाणे पिंपरी – चिंचवड शहराची वाहतूक समस्या बिकट नाही .रस्ते प्रशस्त असल्याने बीआरटीएस सेवा अधिक वेगवान आहे . त्यामुळे शहरातील एकही बीआरटी मार्ग बंद केला जाणार नाही , असे त्यांनी स्पष्ट केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *