गुणवंत बक्षीस योजनेचा सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार लाभ

१४ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


महापालिका नगरवस्ती विभागाअंतर्गत दहावी आणि बारावी बक्षीस योजनेत तत्कालीन आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाचा फटका खासगी शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना बसणार होता.‌ त्यांनाही कौतुकाची थाप मिळावी, यासाठी केलेल्या पाठपुराव्याला आयुक्त शेखर सिंह यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे यश आले. त्यामुळे एसएससीसह सीबीएससी व आयसीएसई बोर्डाच्या तसेच बारावीत ८० टक्क्यांवरील विद्यार्थ्यांना बक्षीस मिळणार आहे, अशी माहिती स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी दिली.

आयुक्त शेखर सिंह यांनी धोरणात्मक निर्णय घेऊन विद्यार्थी व पालकांना दिलासा दिला आहे. या संदर्भात मडिगेरी यांनी म्हटले आहे की, महापालिका समाज विकास विभाग इतर कल्याणकारी योजनेअंतर्गत दहावी, बारावीत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस योजना राबवित आहे. ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस दिले जाते. ही योजना एसएससी, सीबीएससी आणि आयसीएसईच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना लागू होती. परंतु तत्कालीन आयुक्तांनी केवळ एसएससी व आरटीईअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक किंवा अभिनंदन करताना श्रीमंत-गरीब असा भेदभाव करणे गैर आहे. ही बक्षीस योजना सीबीएससी व आयसीएसई यांनाही पूर्वी प्रमाणेच सुरू करावी, अशी मागणी शेखर सिंह यांच्याकडे केली होती. त्याबाबत पाठपुरावा केला. त्यांनी प्रशासकीय अधिकारात धोरणात्मक निर्णय घेत विद्यार्थी मित्रांना दिलासा दिला आहे. त्यानुसार दहावीत ८० ते ९० टक्के गुण मिळविणाऱ्या एसएससी आणि आरटीईअंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांना १० हजार, इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना पाच हजार रुपये आणि बारावीत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या एसएससीच्या विद्यार्थ्यांना १५ हजार व इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना साडेसात हजार रुपये बक्षीस मिळणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *