डॉ. सत्यवान थोरात यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
१२ नोव्हेंबर २०२२

नारायणगाव


ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील व्यावसायिक विभागाचे प्रमुख डॉ. सत्यवान थोरात यांना राज्य सरकारच्या व्यवसाय शिक्षण विभागामार्फत उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत पुणे विद्यार्थीगृहाच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधील सभागृहात हा नारीशक्ती सन्मान व शिक्षकांचा गौरव सोहळा संपन्न झाला. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयाचे सहसंचालक चंद्रकांत निनाळे, ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपुर व मराठवाडा मित्र मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांच्या हस्ते हा विशेष गौरव पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी उपसंचालक यतिन पारगावकर, भावसार, ढेकणे व पुणे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी बी.आर. शिंपले आदी मान्यवर उपस्थित होते. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यातील व्यवसाय अभ्यासक्रम विभागात काम करणाऱ्या उत्कृष्ट शिक्षक महिला नारीशक्ती व पुरुष शिक्षकांचा गौरव केला. या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पुणे जिल्ह्यामधून डॉ. थोरात यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल उत्कृष्ट व गुणवंत शिक्षक म्हणून गौरवण्यात आले.

डॉ. सत्यवान थोरात गेली २७ वर्षे सबनिस विद्यामंदिरातील व्यावसायिक विभागात कार्यरत आहेत. आधुनिक शेती करण्यासाठी अनेक शेतकरी मेळाव्यातून त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील बी.एस्सी. (ॲग्री.) व बी. एस्सी. (हॉर्टी.) या पदवीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक तज्ज्ञ म्हणूनही डॉ. थोरात यांचे कार्य उल्लेखनीय आहे. पडीक जमिनीवर व डोंगरावर वृक्ष लागवड, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सायकल फ़ेरी, स्वयंरोजगार व व्यसनमुक्तीसाठी व्याख्याने अशा अनेक सामाजिक उपक्रमातही त्यांचे काम मोलाचे आहे. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील या बहुमूल्य कार्याची दखल घेऊन डॉ. थोरात यांना हा पुरस्कार देण्यात आला. ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष अनिल मेहेर, कार्यवाह रवींद्र पारगावकर, उपाध्यक्ष सुजित खैरे व सर्व शिक्षकवृंदांनी डॉ. थोरात यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. अशी माहिती सबनिस विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका अनुराधा पुराणिक यांनी दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *