2004 मध्ये उद्धव ठाकरे यांनी माझं तिकीट कापण्याचा प्रयत्न केला – गजानन कीर्तिकर

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१२ नोव्हेंबर २०२२


खासदार गजानन कीर्तिकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला आहे. मी 56 वर्ष शिवसेनेसोबत आहे. ज्येष्ठ आणि निष्ठावंत म्हणून मला बिरुदावली मिळालेली आहे. ठाकरे गट सोडून जाताना कीर्तिकर यांनी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावरती गंभीर आरोप केलाय. उद्धव ठाकरे यांनी 2004 मध्ये माझं तिकीट कापण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यानी केला आहे.

कीर्तिकर म्हणाले की, 2004 मध्ये उद्धव ठाकरे यांनी माझं तिकीट कापण्याचा प्रयत्न केला होता. एका उत्तर भारतीय बिल्डरला तिकीट देण्यासाठी माझा पत्ता कापला जाणार होता. पण बाळासाहेबांनी ते होऊ दिलं नाही. मला तिकीट दिलं.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मला बाळासाहेबांनी चौथ्यांदा तिकीट दिलं होतं त्यानंतर 2009 मध्ये माझा पत्ताच कट केला. मला उमेदवारीही दिली नाही. माझा पीए सुनील प्रभू त्याला बंगल्यावर बोलवून मी तुला तिकीट देणार आहे. कीर्तिकरांना तिकीट देणार नाही. त्यामुळं तू कामाला लाग असं सांगितलं गेलं. इतका मोठा पक्षप्रमुख असा विचार करतो? असंही पुढे कीर्तिकर म्हणालेत.

शिवसेनेत असताना तोंड दाबून बुक्क्याचा मार होता. आम्ही अपमान सहन करत होतो. पण आम्ही शिवसेना सोडून गेलो नाही. आमचा अपमान होत होता. 2019ला आम्ही एनडीएसोबत होतो. आम्हाला मंत्रिपद मिळालं. पण ते अरविंद सावंतला दिलं. तुमची खासगी माणसं आणि तुमच्या मर्जीतल्या माणसाला दिलं. तेव्हा का शिवसेनेचा ज्येष्ठ नेता आठवला नाही? गजानन कीर्तिकर का आठवला नाही? असा सवाल त्यांनी केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊ नका. ते शिवसेनेसाठी घातक असेल. या आघाडीमुळे शिवसेनाच उजाडेल, असं आम्ही उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं. त्यांना तसा प्रस्तावही दिला होता. आम्हाला वाटलं काही बदल होईल. ते झालं नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *