देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्रीपद झेपत नाही – सुषमा अंधारे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
११ नोव्हेंबर २०२२


सुषमा अंधारे यांनी आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधला. कुठे काळं फासलं असेल, महिलांवर अत्याचार होत असतील आणि महिलांवर गरळ ओकली जात असेल या सर्वांवर मी फक्त फडणवीस यांनाच प्रश्न विचारते. गृहमंत्रालय नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला. फडणवीस यांच्यावर वर्कलोड खूप आहे. मला त्यांची काळजी वाटते. मी त्यांची बहीण आहे. त्यांनी थोडा वर्कलोड कमी केला पाहिजे. गृहमंत्रीपद त्यांना झेपत नाही. त्यामुळे त्यांनी ते कुणाला तरी दिलं पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.

संसद रत्न पाच वेळा मिळालेल्या महिलेबद्दल कृषी मंत्र्यांनी अपशब्द वापरले. संभाजी भिडे महिला पत्रकाराला बोलले. गुलाबराव पाटीलही माझ्याबद्दल बोलले. त्यावर असं बोलू नये, असं इतक्या गुळगुळी भाषेत गृहमंत्री मखलाशी करत असतील तर त्याचा अर्थ समजून घ्या, असंही त्या म्हणाल्या. संजय राऊत यांच्या येण्यामुळे शिवसेनेची ऊर्जा आणि ताकद वाढली आहे. उमेद वाढली आहे. ही अटकच बेकायदेशीर होती हे कोर्टाने निरीक्षण नोंदवलं आहे. ईडीने ज्या ज्या कारवाया केल्या त्यातून आरोप सिद्ध होण्याचा रेट खूप कमी आहे. मग ईडी कशासाठी आहे? असा सवाल त्यांनी केला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *