केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्यांप्रमाणे वागतात आहेत – उद्धव ठाकरे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१० नोव्हेंबर २०२२


पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी खासदार संजय राऊत यांना काल जामीन मिळाल्यानंतर आज ते  उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ‘मातोश्री’ या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले होते. यावेळी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी केंद्रीय तपास यंत्रणांवर जोरदार टीका केली.

संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत. तसेच खासदार, सामनाचे कार्यकारी संपादक आणि माझे मित्रही आहेत. त्यांची जामीनावर सुटका झाली त्यांचा मला आनंद झाला आहे. मात्र, काल न्यायदेवतेने जो निर्णय दिला आहे, मी न्यायालयचे आभार मानतो. या निकालपत्रात न्यायालयाने परखड आणि अत्यंत स्पष्टपणे काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत. त्यामुळे आता हे जगजाहीर झालं आहे की, केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्यांप्रमाणे वागतात आहेत. ज्यांच्या अंगावर जा म्हटलं त्यांच्या अंगावर जातात. बेकायदेशीरपणे वागत असल्याचे संपूर्ण देशाने, जगाने बघितले आहे”, अशी प्रतिक्रिया उद्दव ठाकरे यांनी दिली.

केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू यांची हल्लीची वक्तव्य पाहता न्यायव्यवस्था देखील आपल्या हाताखाली घेण्याचे प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. सर्वसामान्यांसाठी शेवटची आशा हे न्यायालय असते, आणि हेच न्यायालय केंद्र सरकार आपल्या बुडाखाली घेत आहे. त्यामुळे देशातील तमाम जनतेने याचा विरोध करायला हवा असेही ते म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *