पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी १६१ गावांच्या क्लस्टर एसटीपी प्रकल्पाबाबत समन्वयाने नियोजन करा – मुख्यमंत्री शिंदे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१० नोव्हेंबर २०२२


नवनिर्मित इचलकरंजी महानगपालिका क्षेत्रातील विकास कामांना विशेषतः हातकणंगले लोकसभा मतदार संघातील नगरपालिकांमधील बाजारपेठेतील महत्त्वाचे रस्ते विकास, पाणीपुरवठा तसेच या परिसरातील वस्त्रोद्योगासह, पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक ते प्रय़त्न केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

पंचगंगा नदीकाठच्या १६१ गावांच्या सांडपाणी प्रक्रियेसाठी क्लस्टर एसटीपी पद्धतीने आराखडे तयार करण्यासाठी विविध विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. हातकणंगले मतदारसंघातील ग्रामीण आणि नागरी प्रश्नांबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मंत्रालयात झालेल्या बैठकीस कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार धैर्यशील माने, राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे विविध नगरपालिकांचे मुख्याधिकारी आदी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

मुख्यमंत्री म्हणाले, इचलकरंजी ही नवनिर्मित महानगरपालिका आहे. या महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांसह या परिसरातील विविध नगरपालिकांमधील विकास कामांना विविध योजनांमधून निधी देताना निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. या विविध कामांसाठी, प्रकल्प आणि योजनांसाठी वेळेत प्रस्ताव सादर केले जावेत. प्रत्यक्ष कामांमध्येही दर्जावर लक्ष दिले जावे. या परिसरातील पर्यटन संधी विषयी आराखडा तयार करण्यासाठी पर्यटन विभागाने तज्ज्ञांची मदत घ्यावी. शिवराज्य भवन या योजनेतील कामांसाठी बांधकाम विभागाच्या सहभागातून एक टाईप प्लॅन तयार करून घ्यावा. जेणेकरून सर्वत्र एकाच प्रकारच्या इमारती व सुविधा निर्माण करता येतील. नगरपालिका क्षेत्रातील बाजारपेठांधील मुख्य बाजारपेठांच्या रस्तांचा एक मॉडेल पद्धतीने विकास करता येईल. त्यासाठी सुशोभीकरणासह उत्कृष्ट नियोजन करण्यात यावे,अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *