पिंपरीत ‘हर हर महादेव’ चा विशाल इस्क्वेर मध्ये चालू शो संभाजी ब्रिगेडकडून बंद

०७ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटावर छत्रपती संभाजीराजेंनी आक्षेप घेतल्यानंतर आता संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. पिंपरीत ‘हर हर महादेव’चा चालू शो बंद पाडला. पिंपरीतील विशाल इस्क्वेर मध्ये हा चित्रपट सुरू होता, तेव्हाच संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते थिएटरमध्ये दाखल झाले.चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमधील प्रेक्षकांना बाहेर काढत हा चित्रपट बंद पाडण्यात आला आहे. या सर्व घडामोडींमुळे याठिकाणी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. हर हर महादेव या चित्रपटात शरद केळकर, सुबोध भावे, अमृता खानविलकर, मिलिंद शिंदे यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप संभाजीराजेंनी केला आहे. अशा प्रकारचे चित्रपट पुन्हा बनले तर खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला होता.

चुकीचा इतिहास दाखविण्यात आल्याचा विरोध करत चित्रपट बंद करण्याचे निवेदन

“ऐतिहासिक चित्रपट निघतायेत ते कौतुकास्पद आहे. पण चित्रपटाच्या स्वातंत्र्यानुसार इतिहासातील घडामोडींची मोडतोड केली जातेय. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटाला चालणार नाही. हर हर महादेव या चित्रपटात इतिहासाची प्रचंड मोडतोड करण्यात आली आहे”, असा आरोप संभाजीराजेंनी केला होता. संभाजीराजे छत्रपती यांनी चित्रपटावर आक्षेप घेतल्यानंतर संभाजी ब्रिगेडही आक्रमक झाली. हर हर महादेव आणि वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटांची निर्मिती करणाऱ्यांना त्यांनी तीव्र शब्दांत इशारा दिला आहे. “हर हर महादेव हा चित्रपट थिएटरमध्ये दाखवणं थांबवा. चित्रपटगृहात पडदे फाडल्याशिवाय थिएटर मालकांना अक्कल येणार नाही”, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी दिला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *