संभाजी भिडेंना राज्य महिला आयोगाची नोटीस

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०३ नोव्हेंबर २०२२


वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत असणारे संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराशी केवळ टिकली लावली नाही म्हणून बोलण्यास नकार दिल्याचा प्रकार बुधवारी मंत्रालयामध्ये घडला. या प्रकरणाची दखल थेट राज्य महिला आयोगाने घेतली आहे. टिकली लावली नाही तर प्रतिक्रिया देणार नाही या भुमिकेसंदर्भात स्पष्टीकरण भिडे यांनी तात्काळ द्यावं अशी नोटीसच पाठवली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीटरवरुन हे पत्र शेअर केलं आहे. बुधवारी संभाजी भिडे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर एका महिला पत्रकाराने त्यांच्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘आधी कुंकू लाव मगच तुझ्याशी बोलतो,’ असं म्हणत संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराला प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. या प्रकरणावरुन प्रतिक्रिया उमटत असतानाच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भिडे यांना टिकली लावल्यावरच प्रतिक्रिया देणार ही भुमिका तातडीने स्पष्ट करावी अशी नोटीस पाठवली आहे.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, १९९३ अंतर्गत कलम १० (१) (फ) (एक) व (२) नुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगास स्त्रियांच्या तक्रारी विचारार्थ स्विकारणे आणि त्या बाबींची स्वाधिकारी दखल घेणे याकरीता प्राधिकृत करण्यात आले आहे. महिला पत्रकाराने कपाळावर टिकली लावली नाही म्हणून आपण तिच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. स्त्रीचा दर्जा तिच्या कर्तुत्वाने सिद्ध होत असतो. आपले वक्तव्य स्त्री सन्मानाला आणि समाजिक दर्जाला ठेच पोहचविणारे आहे, असं चाकणकर यांनी पत्रात म्हटलं आहे.

आपल्या वक्तव्याबाबत समाजातील सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने त्याची दखल घेतली आहे. तरी कपाळावर टिकली नाही म्हणून महिला पत्रकाराशी बोलण्यास नकार देण्यामागील आपल्या भुमिकेचा खुलासा महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ कलम १२ (२) व १२ (३) नुसार तात्काळ सादर करावा, असे निर्देश भिडेंना देण्यात आले आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *