पुण्यात मनसे 3500 राजदूत नेमणार

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०२ नोव्हेंबर २०२२

पुणे


पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे सज्ज झाले आहेत. पुण्यासाठी त्यांनी नवी रणनिती आखली आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्यासाठी राजदूत नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच मुंबईत पदाधिकारी आणि पक्षाच्या सचिवांची बैठक पार पडली आहे. पुण्यात मनसे 3500 राजदूत नेमणार आहे. पुण्यातील प्रत्येक सर्वसामान्य नागरीक आणि मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी मनसेने राजदूत ही नवी संकल्पना आणली आहे. या उपक्रमातून मनसे पुण्याच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे.

पुण्यात लवकरच राजदूतांची नेमणूक करण्यात येईल. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुण्यात मेळावा होईल. या मेळाव्यानंतर लगेच आगामी पुण्याच्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची भव्य सभा देखील घेतली जाण्याची शक्यता आहे. मनसेच्या स्थापनेपासूनच ठाकरे यांनी नाशिक आणि पुण्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पुण्यात पहिल्या प्रयत्नातच मनसेचे तब्बल २९ नगरसेवक निवडून आले होते. रमेश वांजळे यांच्या रूपाने एक आमदारही निवडून आला होता. त्यामुळे पुण्याकडून ठाकरे यांना कायमच अपेक्षा असतात.

पुण्याचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना राजदूत नेमण्याबाबत सूचना केल्या आहेत. मनसेच्या संघटनात्मक पातळीवरच्या विभागनिहाय नेमणुका करण्यात येणार आहेत. दरहजारी मतदारांच्या मागे एक राजदूत नेमण्यासाठी आवश्‍यक तयारी करण्यात येत असल्याचे शहराध्यक्ष बाबर यांनी सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *