माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील – राजन विचारे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१८ ऑक्टोबर २०२२


शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार राजन विचारे यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं पत्र महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पाठवलं आहे. तसेच आपली पोलीस सुरक्षा कमी करण्यात आली असून जीवाचं काही बरं वाईट झाल्यास त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील असंही विचारे यांनी म्हटलं आहे.

राजन विचारेंनी पत्रात म्हणाले आहे की, १३ ऑक्टोबर २०२२ रोजी आमच्या शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या शिष्ठमंडळाने आपली भेट घेऊन, महाराष्ट्र शासनाकडून व प्रशासनाकाडून संपूर्ण ठाणे जिल्हातील पदाधिकाऱ्यांवर, कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने तडीपार, प्रशोभक भाषण कलमाअंतर्ग गुन्हे, खोट्या केसेस, आक्षेपार्ह घोषणा दिल्याबद्दल गुन्हे अनेक कार्यकर्त्यांना नोटीसा तसेच शिंदे गटाकडून शाखा बळकावणे, वाचनालय बळकावणे, वर्षानुवर्षे ‘आनंद चॅरिटेबल ट्रस्ट’मार्फत सुरु असल्ले्या दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या जागावरे हक्क सांगणे, पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना धमक्या देणे. इत्यादी चिथावणीखोर प्रकार तथाकथित स्वत:ला ठाणे जिल्हाप्रमुख समजणाऱ्या नरेश म्हस्के यांच्या निर्देशावरुन होत आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. आम्ही आमच्याकडून संयम ठेवलेला आहे.

अशा उपरोक्त परिस्थितीतच माझा मतदारसंघ ठाणे, नवी मुंबई,मीरा-भाईंदर इथपर्यंत पसरलेला आहे. या महापालिका मतदारसंघाचे क्षेत्रफळ मोठे असल्याने मला वारंवार रात्री अपरात्री मतदारसंघात जावून नागरीकांच्या समस्या सोडवाव्या लागतात. त्यामुळेच मला २०१९ च्या ठाणे लोकसभा निवडणुकीत ७ लाख ४० हतार ९६९ मते मिळाली. परंतु शासनाने सूडबुद्धीने माझ्या अंगरक्षक पोलीस संरक्षणात कपात केलेली आहे. हा मला एक षडयंत्राचाच भाग वाटतो.

आश्चर्य म्हणजे शिंदे गटातील ज्यांना शासकीय किंवा राजकीय उच्च पद नाहीत अशांनाही पोलीस संरक्षण देण्यात आलेले आहे. माझ्या अंगरक्षकांच्या संख्येत कपात केल्यामुळे माझ्या व कुटुंबियांच्या जिवीतेला धोका निर्माण झाला आहे. दुर्देवाने अशी काही दुर्घटना झाल्यास त्यास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री वर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार राहतील. तरी कृपया माझ्या अंगरक्षक पोलीस संरक्षणात वाढ करावी ही नम्र विनंती.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *