पूजा नरवडे मृत्यू प्रकरण : नरभक्षक बिबट्याला ठार मारा : बिबट्यांची नसबंदी करा : शेतीसाठी दिवसा वीज द्या : विविध मागण्या करत अंत्यसंस्कार

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
१४ ऑक्टोबर २०२२

जांबूत / शिरूर


शिरूर तालुक्यातील जांबूत येथे बुधवारी (दि. १२) बिबट्याच्या हल्ल्यात पूजा नरवडे या तरुणीचा मृत्यू झाला होता. या नरभक्षक बिबट्याला ठार मारा आणि बिबट्यांचे प्रजनन संक्रमण लक्षात घेता, त्यांची नसबंदी करण्यासाठी तातडीने वरिष्ठ पातळीवर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी करीत गुरुवारी गावबंद आंदोलन केले.

पशुधनावर हल्ला करणारा बिबट्या आता घरात येऊन मानवाचे भक्ष करू लागला आहे. अशा अनेक दुर्दैवी घटना घडू लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दोन वर्षांपूर्वी दोन वर्षीय चिमुरडीला बिबट्याने ओट्यावरून उचलून नेत ठार केले होते. एक महिन्यापूर्वी सचिन जोरी या तरुणाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. यानंतर बुधवारी (दि. १२) पूजा नरवडे या तरुणीवर बिबट्याने हल्ला करत तिला उसात नेत ठार केले. जांबूत, वडनेर, पिंपरखेड परिसरातील अनेक शेतमजुरांवर बिबट्यांनी हल्ले करत जखमी केलेले आहे. तर अनेक पाळीव प्राण्यांनाही बिबट्याने ठार केलेले आहे. एवढ्या घटना घडूनही वनविभागाकडून अजूनही बघ्याची भूमिका घेत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या नरभक्षक बिबट्यांच्या तोंडाला मानवी रक्त लागले असल्याने अजून किती लोकांचे बळी जाण्याची वाट प्रशासन बघणार? असे संतप्त सवाल ग्रामस्थांसह शेतकऱ्यांनी उपस्थित करत प्रशासनाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

वनविभागाकडून पकडलेले बिबटे याच परिसरात पुन्हा सोडले जात असल्याचा आरोपही यावेळी ग्रामस्थांनी केला. यापूर्वी या भागात वनरक्षक म्हणून राहिलेले आणि सध्या खेड येथे वनपाल असलेले दत्तात्रय फापाळे यांची नियुक्ती या ठिकाणी करावी अशीही मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.

दरम्यान शिरूर- हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी घटनास्थळी भेट देत भ्रमणध्वनीवरून केडगाव महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता एडके यांच्याशी संपर्क करत या घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले. येत्या दोन दिवसांत तात्काळ शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज देण्याची मागणी त्यांनी केली. यासंदर्भात आपण राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशी संपर्क करून वनविभाग तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, यासाठी महावितरण विभागाला योग्य सूचना करण्यासंदर्भातही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पूजा नरवडे या तरुणीवर गुरुवारी (दि. १३) सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी संतप्त झालेल्या जांबूत ग्रामस्थांनी प्रशासनाला धारेवर धरत गावच्या मुख्य चौकातच अंत्यसंस्कार करण्याचा आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या हल्ल्यांवर योग्य उपाययोजना करण्यासंदर्भात वनविभागाला खडे बोल सुनावले. त्यामुळे नातेवाईक व ग्रामस्थांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
दरम्यान जिल्हा वन अधिकारी अमोल सातपुते यांनी घटनास्थळी भेट देत, महाराष्ट्र शासनाच्या वतीने तातडीची मदत म्हणून दहा लक्ष रू. चा धनादेश पीडित कुटुंबीयांना दिला.

घटनास्थळी माजी आमदार पोपटराव गावडे, भीमाशंकर सह सा का चे संचालक प्रदीप वळसे पा. व संचालक बाळासाहेब घुले, माजी सभापती रामचंद्र ढोबळे, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, माऊली आस्वारे, रा प घोडगंगा सह सा कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे, शिरूर पंचायत समिती सदस्या अरुणा घोडे व डॉ सुभाष पोकळे, टाकळी हाजी चे सरपंच दामू घोडे, जांबूत चे सरपंच दत्तात्रय जोरी, प्रशांत जोरी, बाबासाहेब जोरी, आनंद शिंदे, बाळासाहेब पठारे, अनिल लबडे व गावातील सर्वच आजी माजी पदाधिकाऱ्यांनी सातत्याने भेटी देत, बैठका घेत या विषयाची गांभीर्याने दखल घेतलेली आहे. तर शिरूर लोकसभेचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनीही या घटनेची गांभीर्याने दखल घेत, DFO अमोल सातपुते यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन, बिबट्यांच्या या मानवी हल्ल्यांसदर्भात व त्यावरील उपाययोजनांसंदर्भात सखोल चर्चा केली. शिरूर तालुक्यातील जांबूत येथील घटनास्थळी जुन्नर वनविभागाचे उप वनसंरक्षक अधिकारी (DFO) अमोल सातपुते, शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी समक्ष भेटी देत एकंदरीत सर्वच परिस्थितीचा आढावा घेतलाय.

“ही घटना अतिशय दुर्दैवी असून याबाबत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रधान सचिव (वने) वेणुगोपाल रेड्डी यांच्याशी तातडीने चर्चा केलेली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत याबाबत आराखडा तयार करून मार्ग काढण्यात यावी, अशी विनंती केली आहे. जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्याशी संपर्क करून तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशा सूचना दिल्या आहेत” – दिलीप वळसे पाटील, माजी गृहमंत्री, महाराष्ट्र.

“या परिसरात झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात आजपर्यंत तीन जणांचा बळी गेला आहे. अनेकांवर जीवघेणे हल्ले झालेले आहे. या घटनांनी परिसरातील शेतकरी अत्यंत भयभीत झालेला असून संतप्त शेतकऱ्यांची दिवसा वीज मिळण्याची मागणी आहे. याबाबत राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना याबाबत माहिती दिलेली आहे. येत्या आठ दिवसांत याबाबत कार्यवाही होऊन शेतकऱ्यांना वीज मिळाली पाहिजे” – देवदत्त निकम, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, आंबेगाव (मंचर)

“या भागातील बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता, या परिसरात १४ पिंजरे व २० ट्रॅप कॅमेरे लावण्यात आलेले असून, गरजेनुसार पिंजऱ्यांची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे. ड्रोन कॅमेरांच्या माध्यमातूनही शेतातील लपलेल्या बिबट्यांना वाईल्ड लाईफच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून जेरबंद करण्याचे काम सुरू केले आहे. तरीदेखील या भागातील नागरिकांनी सतर्क रहावे” – मनोहर म्हसेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, शिरूर.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *