जयहिंदच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
१३ ऑक्टोबर २०२२

नारायणगांव


कुरण (ता. जुन्नर) येथील जयहिंद शैक्षणिक संकुलाला २५ वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्ताने रौप्यमहोत्सवी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १२ रोजी या सप्ताहाची उत्साहात सुरूवात झाली. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच जुन्नर तालुक्यातील माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांचा सत्कार यावेळी आयोजित करण्यात आला होता. या शिबीराचे उद्घाटन माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांच्या हस्ते झाले, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एस. गल्हे यांनी दिली. दि. १२ ते १८ ऑक्टोबर यादरम्यान हा सप्ताह साजरा होत असून यामध्ये सोपान कनेरकर, वसंत हंकारे, प्रा. नितीन बानगुडेपाटील, किरण भालेकर, ऋषिकेश चिंचोलकर यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच दि. १६ ऑक्टोबर रोजी १९९७ पासूनच्या जयहिंद शैक्षणिक संकुलाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहीती डॉ. गल्हे यांनी दिली. दि. १८ ऑक्टोबर रोजी रौप्य महोत्सव सप्ताहाची सांगता व शिवनेरभूषण, शिक्षणमहर्षी स्व. तात्यासाहेब गुंजाळ यांचे द्वितीय पुण्यस्मरण सोहळा विधानसभेचे माजी अध्यक्ष व आमदार दिलीप वळसेपाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व आमदार अतुल बेनके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणात आहे.

जयहिंद शैक्षणिक संकुलाला २५ वर्ष पूर्ण

मुख्याध्यापक सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना शांतीलाल सुरतवाला म्हणाले, आपल्या देशाला पुढे न्यायचे असेल तर अनिष्ट रुढी, परंपरा, अंधश्रध्दा यांचे समुळ उच्चाटन होणे आवश्यक असून त्याची सुरूवात विद्यार्थ्यांपासून व्हायला हवी व यासाठी शिक्षक वर्गाने पुढाकार घ्यायला हवा. पुढच्या पिढीला प्रचारी करण्यापेक्षा विचारी करणे जास्त महत्वाचे आहे. आपण आज शिक्षण देत आहोत पण जीवनाची आदर्श मुल्ये तत्वे यांची शिकवण मात्र कमी पडते. विद्यार्थी दशेतच संस्काराचे बीज पेरले तर पुढील काळात देश प्रगतीपथावर नेणे शक्य आहे व त्यासाठी सर्वांनी सामुहिक प्रयत्न केले पाहिजेत. भ्रष्टाचार व अनिष्ट रुढींवरही सुरतवाला यांनी भाष्य केले आज आपण पाणी विकत घेत आहोत पण मुळ पाण्याचे स्त्रोत नद्या जर स्वच्छ ठेवल्या तर पुढील काळात पुर्वीप्रणाने स्वच्छ पाणी सहज व विनामुल्य उपलब्ध होईल. प्रत्येकाने आपले जीवनमान, राहणीमान उत्तमप्रकारे करून देशसेवा व समाजसेवाही केली पाहिजे. शिक्षण माणसाला जगवते तर शिकवण माणसाच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देते हे ब्रीद त्यांनी उपस्थितांना दिले. आजचा समाज फक्त शिक्षीत झाला आहे त्याला संस्कारांची जोड देऊन सुशिक्षित करायचे आहे. या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने आचार्य आनंद ऋषिजी रक्तपेढी यांच्यामार्फत आयोजित रक्तदान शिबिरामध्ये १०८ रक्तदात्यांनी रक्तदान केले, तसेच ३४० रुग्णांची आरोग्य तपासणी व डॉ. मनोहर डोळे मेडीकल फाऊंडेशनच्या वतीने नेत्र तपासणी करण्यात आली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र गुजाळ, सचिव विजय गुंजाळ, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तबाजी वागदरे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी आचार्य आनंदऋषीजी ब्लड बँकेचे विश्वस्त प्रल्हाद तापकीर, जनसंपर्क अधिकारी सुनिल खताळ, समर्थ व्यायाम मंदिर विश्वस्त शशिकांत सिन्नरकर, जगन्नाथशेठ कवडे, लायन्स क्लब जुन्नरचे अध्यक्ष संतोष रासणे व त्यांचे पदाधिकारी तसेच संस्थेचे सर्व संचालक मंडळ, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेच्या संचालिका डॉ. शुभांगी गुंजाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. हेमंत महाजन यांनी सुत्रसंचालन केले. जयवंत घोडके यांनी आभार मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *