निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रया

आपला आवाज न्यूज नेटवर्क
११ ऑक्टोबर २०२२


आगामी अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाच्या दृष्टीने निवडणूक आयोगाकडून एक मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे गटाला ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ आणि एकनाथ शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलं आहे. याशिवाय ठाकरे गटासाठी ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आलं आहे. तर शिंदे गटाचे तिन्ही चिन्हं निवडणूक आयोगानं अमान्य केली असून पुन्हा नव्याने तीन चिन्हे सूचवा, असा आदेश दिला आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले अंधेरी पोटनिवडणूक आम्ही युती म्हणून लढवणार आहोत. निवडणूक आयोगाकडे आम्ही धनुष्यबाण हे चिन्ह मागितलं होतं, परंतु ते मिळालेलं नाही. ही आमच्यासाठी एक दु:खद घटना आहे. कारण शेवटी मेरीटवर आतापर्यंत निवडणूक आयोगाने घेतलेले निर्णय जर पाहिले तर ज्या पक्षाकडे बहुमत असतं. ज्यापक्षाकडे विधीमंडळात बहुमत आणि संघटनात्मक बहुमत असतं त्याला चिन्ह मिळतं. कारण, चिन्ह देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. आमच्याकडे विधानसभा, लोकसभेत जवळपास ७० टक्के बहुमत आहे. ७० टक्क्यांपेक्षा जास्त मतांची आकडेवारीही आमच्याकडे होती.

याचबरोबर हजारो, शेकडो लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पंचायत समिती, जिल्हापरिषद सदस्य, कार्यकर्ते सगळे आमच्याकडे आहेत, त्यांनी समर्थन दिलं आहे. किंबहूना या देशातील १४ राज्य प्रमुखांनीही त्यांच्या राज्यातील शिवसेनेचं समर्थनही आम्हाला दिलं. असं भरोघोस पाठिंबा आणि समर्थन आमच्याकडे म्हणजेच बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे असताना, हे धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळालं नाही. हा आमच्यावरचा खऱ्या अर्थाने अन्याय आहे. म्हणून याबाबतही आमचा प्रयत्न आहे की मेरीटवर आधारित तुम्ही यापूर्वी जे काही निर्णय घेतले, तेच मेरीट आमच्या प्रकरणात लावलं पाहिजे आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे. असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी म्हणाले. विरोधकांकडून विशेष करून उद्धव ठाकरे यांनी काल केलेल्या टीकेवर बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी, आम्ही आमचं काम करतोय, प्रत्येक टीकेचं उत्तर देण्याची आवश्यकता मला नाही. आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी यासाठी सक्षम आहेत अशी प्रतिक्रिया दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *