एकनाथ खडसे यांची उद्धव ठाकरेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१० ऑक्टोबर २०२२


राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर पक्षचिन्ह गोठवल्यानंतर सडकून टीका केली आहे. दोघांच्या भांडणामुळे शिवसेनेचे दोन तुकडे झाले असून पक्ष दुभंगला आहे, असे जळगावातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत खडसे यांनी म्हटले आहे. सेनेतील ही फूट राज्याच्या दृष्टीने योग्य नाही. यामुळे भाजपाला मजबूत होण्याची संधी मिळत असल्याचे खडसे म्हणाले आहेत. शिवसेनेची सद्यस्थिती पाहता उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदेंनी काय केलं? यावरुन दोष देण्यात काहीही अर्थ नाही. पक्षप्रमुख म्हणून चुका होत राहतात. काही चुका या उद्धव ठाकरे यांच्याकडूनही झाल्या असतील. मात्र, एखादी चूक एवढी मोठी नसावी की ज्यामुळे पक्ष संपवून टाकावा. आता तेही संपले आणि तुम्हीही संपले, अशी स्थिती निर्माण होता कामा नये असे खडसे यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाच्या संघर्षावर न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वजण आशेने पाहत आहे. मात्र, न्यायालय सुद्धा काही वेगळा निर्णय देईल असे वाटत नसल्याचे मत खडसे यांनी व्यक्त केले. बाळासाहेब ठाकरे यांनी मोठ्या मेहनतीने शिवसेना राज्यात उभी केली. त्यांच्याच मेहनतीमुळे धनुष्यबाणाला एक वेगळी प्रतिष्ठा संपूर्ण महाराष्ट्रात मिळाली, असे खडसे यांनी म्हटले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठवण्याचा निर्णय शनिवारी सायंकाळी जाहीर केला. अंधेरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना या निवडणुकीत शिवसेनेचे नाव आणि चिन्ह वापरता येणार नसल्याने नवा पेच निर्माण झाला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *