पैगंबर जयंतीनिमित्त आयोजित आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
१० ऑक्टोबर २०२२

नारायणगाव


नारायणगाव (ता.जुन्नर) – येथे हजरत पैगंबर जयंतीनिमित्त सुन्नी मुस्लिम जमाअत यांच्या वतीने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. प्राथमिक आरोग्य केंद्र वारूळवाडी, डॉ.मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन यांच्यावतीने हिमोग्लोबिन, थायरॉईड, रक्तदाब, मधुमेह, लुपिड प्रोफाइलसह महिलांच्या विविध आजारांवर समुपदेशन करण्यात आले. तसेच डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनद्वारे मोतीबिंदू सहित डोळ्यांच्या विविध आजारांच्या तपासण्या करण्यात आल्या. मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांची सवलतीच्या दरात लेन्स टाकून मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तसेच आवश्यक विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राकडून मोफत चष्मे दिले जाणार आहेत. यावेळी दंतरोग तज्ञ डॉ.वहाब शेख यांच्या रुग्णालया्कडून मोफत दंत तपासणी करण्यात आली.

कुरआन पठण, जुलूस तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

शिबिरात सुमारे ५०० नागरिकांनी सहभाग घेतला शिबिराचे उद्घाटन लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे व युवा नेते अमित बेनके यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसरपंच आरीफ आतार, डॉ.संदीप डोळे, माजी उपसरपंच संतोष वाजगे, संतोष पाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सरपंच भावेश डोंगरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी, गणेश वाजगे, रमेश मेहत्रे, नायब तहसिलदार स‍ुधीर वाघमारे, राजेश कोल्हे, मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष एजाज आतार, हाजी अब्दुल रज्जाक कुरेशी, मुस्लिम समाजाचे सर्व विश्वस्त, कार्यकर्ते, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त सर्व मुस्लिम महिलांसाठी आयेशाबी मदरसा संगमनेर यांच्या सहकार्याने धार्मिक संमेलनाचे (इजतेमा) आयोजन करण्यात आले होते. मदरसा अरबीया गुलशने मदीना मधील अकरा विद्यार्थ्यांनी कुरान पठण पूर्ण केल्याबद्दल यावेळी त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांना मौलाना सादिकुल इस्लाम, जुन्नर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पवित्र कुरआन प्रत भेट देऊन गौरविण्यात आले. सुन्नी मस्जिदीचे इमाम मौलाना अब्दुल बारी आणि हाफिज शहबाज रिजवी यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक तकरीर (प्रवचन), नाअतखानी, दरुदोसलाम, इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


पैगंबर जयंतीच्या कार्यक्रमाचा समारोप नारायणगाव बाजारपेठ मार्गे भव्य जुलूस काढून करण्यात आला. जुलूसमध्ये लहान मुले, विद्यार्थी, युवक, जेष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. जुलूस मध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सवानिमित्त तिरंगा फडकविणारे विद्यार्थी, तसेच युवकांनी तयार केलेला दरगाह चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.नारायणगाव पूर्ववेशी जवळ मुस्लिम समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या जुलूसचे स्वागत सरपंच योगेश पाटे, उपसरपंच आरिफ आतार, आशिष माळवदकर, विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन किरण वाजगे, संतोष दांगट, संतोष पाटे, अक्षय वाव्हळ यांनी केले. याप्रसंगी जुन्नर तालुक्याचे तहसिलदार रवींद्र सबनीस, नारायणगाव ग्रामपंचायत आणि पोलीस स्टेशन नारायणगाव यांच्या वतीने सरपंच योगेश पाटे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शभेच्छा दिल्या. जुलूसची सांगता सुन्नी जामे मस्जिद येथे सलाम व दुवा पठण व प्रसाद वाटपाने झाली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *