हिंदूत्वाबाबत तडजोड नाही – उद्धव ठाकरे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०६ ऑक्टोबर २०२२


शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाषणात हिंदूत्वाच्या मुद्यावरून भाजप आणि शिंदे गटावर घणाघाती टीका केली. काँग्रेसबरोबर आघाडी केली म्हणून आम्ही हिंदूत्व सोडले, अशी टीका भाजपकडून केली जाते. पण, शिवसेनेने कधीही हिंदूत्व सोडलेले नाही. आमचे हिंदूत्व देशाशी जोडलेले आहे, तुमचे हिंदूत्व हे शेंडी- जानव्याशी जोडलेले आहे. नुसती जपमाळ करून कोणी हिंदू होत नाही.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मशिदीत गेलेले चालतात. लालकृष्ण अडवाणी यांनी पाकिस्तानात जाऊन जिनांच्या थडग्यावर माथे टेकवले किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवाझ शरीफांच्या वाढदिवसाला जाऊन केक कापला, त्यात भाजपला काही वावगे वाटत नाही. पण आम्ही काँग्रेसबरोबर आघाडी केली तर हिंदूत्व सोडले, अशी आवई उठवली जाते. याच न्यायाने भागवत मशिदीत गेले म्हणजे भाजप-संघ परिवाराने हिंदूत्व सोडले असे मानायचे का, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केला. हिंदूत्वाबाबत तडजोड नाही स्पष्ट करत ठाकरे यांनी भाजपसह शिंदे गटाला लक्ष्य केले.