अभूतपूर्व गोंधळात रा प घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा संपन्न

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
०२ ऑक्टोबर २०२२
शिरूर


पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील न्हावरे या ठिकाणी असलेल्या, रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा, दि. २९ सप्टेंबर २०२२ रोजी पार पडली. या कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागलेली असून, कारखान्यावर सध्या शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार अॅड. अशोक पवार यांची सत्ता असून, गेली अनेक वर्ष ही सत्ता त्यांच्याकडेच आहे. परंतु काही वर्षांपासून तालुक्यातील राजकीय समीकरणे बदललेली असून, यंदाची निवडणूक ही सर्व विरोधकांनी प्रतिष्ठेची करत, विरोधक एकवटल्याचे चित्र दिसत आहे.

चेअरमन चोर है च्याही घोषणा : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल

सातत्याने कारखाना प्रशासन व चेअरमन यांनी कशा चुका केल्यात हे दाखविण्यासाठी पत्रकार परिषदा घेऊन त्यातून माहिती दिली जात आहे. मागील महिन्यात माजी आमदार व भाजप चे नेते स्व. बाबुराव पाचर्णे यांचे निधन झाले. त्यांनीही निवडणुकीत उभे राहण्यासाठी अर्ज भरलेला होता व तो वैध ही ठरला होता. परंतु त्यांच्या निधनानंतर त्या जागेचा प्रश्न निर्माण झाल्याने, त्यासंदर्भात उच्य न्यायालयात निर्णय होणे बाकी आहे. परंतु या प्रक्रियेदरम्यान न्यायालयात स्व. बाबुराव पाचर्णे यांच्या संदर्भात कारखान्याच्या विद्यमान प्रशासनाने व चेअरमनने अपशब्द वापरल्याचा ठपका विरोधकांनी केल्याने, तालुक्यातील राजकीय वातावरण तापलेले होते. त्यामुळे कारखान्याची सर्वसाधारण सभा वादळी होणार हे सर्वांनाच माहिती होते. त्यामुळे तालुक्यातील नेतेमंडळी, कारखान्याचे सभासद, बिगर सभासद व बघ्यांनी मोठी गर्दी कारखान्यावर केली होती.

कारखाना सभास्थळी शिरूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत स्वतः हजर होते. तसेच पोलिसांचा मोठा बंदोबस्तही होता. सभास्थळावर कारखान्याचे व प्रसार माध्यमांचे अनेक कॅमेरेही लागलेले होते. परंतु सत्ताधारी व विरोधक हे दोन्ही गट आक्रमक असल्याने दोन्ही बाजूंनी आपापल्या बाजूच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झाली, तर सामोरच्यांचे निषेध करण्यात आले. विरोधकांनी “अशोक बापू चोर है, चेअरमन चोर है” च्या घोषणा दिल्या. आणि कारखान्याच्या इतिहासात आत्तापर्यंत घडला नाही तो अभूतपूर्व गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.

कारखान्याचे चेअरमन व विद्यमान आमदार पवार यांनी माईक मधून भाषण सुरू करताच, विरोधकांनीही दुसरा माईक घेऊन त्यांचे समाधान न झाल्याने त्यांच्या बोलण्याला टोकत त्यांना प्रतिप्रश्न केले. परंतु दोन्ही बाजूंच्या कार्यकर्ते व सभासदांनी घोषणाबाजी चालू ठेवल्याने, घाईघाईतच सर्व विषय सभेपुढे मांडत ते आवाजी मतदानाने मंजूरही केले. परंतु या सर्वसाधारण सभेतून आता हे नक्की समोर आलेय की येणारी निवडणूक ही अभूतपूर्व होईल. सत्ताधारी व विरोधकांमधील शाब्दिक शीतयुद्धाच्या झडणाऱ्या फैरी हा चर्चेचा विषय बनलेला आहे. त्यामुळे या घडामोडींवर केवळ कारखान्याचे सभासदच नव्हे, तर तालुक्यातील, जिल्ह्यातील व रज्यातील जनतेचे लक्ष लागले असून येणाऱ्या निवडणुकीत नेमके काय चित्र असेल ? हा कुतूहलाचा विषय बनलेला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *