डॉ. रामचंद्र देखणे हे शहराच्या सांस्कृतिक चळवळीचा प्राणवायू – भाऊसाहेब भोईर

रोहित खर्गे
विभागीय संपादक
३० सप्टेंबर २०२२

पिंपरी


पिंपरी चिंचवड शहरात सांस्कृतिक चळवळ रुजविण्यात डॉ. रामचंद्र देखणे यांनी प्राणवायू प्रमाणे काम केले. या शहरात नाट्य परिषदेच्या प्रत्येक मोठ्या उपक्रमात डॉ. देखणे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. माझा पिंड कार्यकर्त्याचा असला तरी मी सांस्कृतिक क्षेत्रात काम करू शकलो याची प्रेरणा मला डॉ. देखणे यांच्यामुळे मिळाली. नाट्य पंढरीचा वारकरी आणि साहित्य पंढरीचा सेवक अशा शब्दरचना मला डॉ. देखणे यांच्यामुळेच शक्य झाल्या. अशा शब्दात डॉ. रामचंद्र देखणे यांना नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साहित्यिक, डॉ. रामचंद्र देखणे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बुधवारी भोईनगर, चिंचवड येथे आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेत भोईर बोलत होते. यावेळी पद्मश्री गिरीश प्रभुणे, महाराष्ट साहित्य परिषदेचे उद्धव कानडे, महाराष्ट्र साहित्य परिषद शहराध्यक्ष राजन लाखे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे पुरूषोत्तम सदाफुले, ज्येष्ठ लेखक, पत्रकार मधु जोशी, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, मोरेश्वर शेडगे तसेच प्रकाश ढवळे, नाना शिवले, श्रीकांत चौगुले, नितीन हिरवे, योगेश महाजन, बाजीराव सातपुते, अशोक महाराज गोरे, सुरेश भोईर, राज अहिरराव, सुहास घुमरे, कैलास बहिरट, रमेश पाचंगे, प्रकाश घावटे, संगीता झिंजुरके, मानसी चिटणीस, वर्षा बालगोपाल, सुप्रिया सोळंकुरे, नितीन हिरवे, योगेश महाजन, बाजीराव सातपुते, अशोक महाराज मोरे, सुरेश भोईर आदी उपस्थित होते.


गिरीश प्रभुणे श्रद्धांजली अर्पण करताना म्हणाले की, ‘‘एकनाथांच्या भारुडाचे सादरीकरण करावे तर ते डॉ. रामचंद्र देखणे यांनीच. लोककलेचा वारसा डॉ. देखणे यांनी वृद्धिंगत केला. गोंधळी, भराडी अशा लोक कलांबरोबरच त्यांचा ज्ञानेश्वरीचा देखील अभ्यास होता. देवीचा जागर, गोंधळी नृत्य सादर करताना त्यांची वेशभूषा आणि सादरीकरण पाहिले, तर डॉ. देखणे हेच आहेत यावर विश्वासच बसत नसे. अनेक संत साहित्याचा अभ्यास करत त्यांनी मार्गदर्शन, लेखन देखील केले. ज्ञान आणि विचार यांचा अनोखा संगम असणारे डॉ. देखणे यांचे व्यक्तिमत्व होते.

पुरुषोत्तम सदाफुले म्हणाले की, डॉ. रामचंद्र देखणे हे माझ्यापेक्षा वयाने लहान असले, तरी ते मला गुरुतुल्य होते. महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेत देखील त्यांचे मोठे योगदान आहे. मला कामगार, साहित्य क्षेत्रात त्यांनी नेहमी प्रोत्साहन दिले.
उद्धव कानडे म्हणाले की, डॉ. देखणे यांनी प्रवचन, नाट्य, लोककला, लोकगीतांचा अभ्यास करून त्याचे सर्वसामान्यांपर्यंत सादरीकरण करण्याची स्वतःची शैली विकसित केली होती. डॉ. देखणे यांच्यामुळेच ग्रामीण भागात असणारी लोककला शहरी भागातील नागरिकांना समजू लागली.

श्रीकांत चौगुले म्हणाले की, डॉ. देखणे पुण्यात राहायचे पण पिंपरी चिंचवड शहराशी त्यांचे जिव्हाळ्याचे आत्म्याचे नाते होते पुणे शहर त्यांची माय, तर पिंपरी चिंचवड मावशी होती. पुणे व पिंपरी चिंचवड ज्या वेगाने वाढत गेले त्याच वेगाने डॉ. देखणे यांची प्रतिभा फुलत गेली. 35 वर्षांच्या नोकरीच्या कार्यकाळात त्यांनी असंख्य व्यक्ती व संस्थांशी प्रेमाची आणि जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले होते. संत साहित्याचे गाढे अभ्यासक, लेखक, कवी व पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे निवृत्त जनसंपर्क अधिकारी डॉ. रामचंद्र देखणे यांच्या स्मृती प्रित्यर्थ पिंपरी चिंचवड शहरात त्यांच्या कार्यांचा गौरव करणारे उचित स्मारक उभारले जावे तसेच या ठिकाणी लोककला व संत साहित्याचे उपक्रम राबवले जावेत हीच खरी डॉ. रामचंद्र देखणे यांना श्रद्धांजली ठरेल अशी मागणी उपस्थित सर्व साहित्यिकांनी केली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *