जागतिक औषध निर्माता दिनानिमित्त, थिटे फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पथनात्यातून केली जनजागृती

रवींद्र खुडे
विभागीय संपादक 
२७ सप्टेंबर २०२२

शिरूर


शिरूर येथील श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेचे सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्मसी व बी. फार्मसी) आणि शिरूर तालुका केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, शनिवार दि. २४ सप्टेंबर २०२२ रोजी ‘जागतिक औषध निर्माता दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. फार्मसिस्ट हा, डॉक्टर व रुग्ण यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करत असतो. समाजाला निरोगी ठेवण्यासाठी अहोरात्र ते आपले योगदान देत असतात. त्याचबरोबर रुग्णांचे मनोबल वाढविण्याचे कामही फार्मसिस्ट कडून केले जाते.


जागतिक औषधनिर्माता दिनानिमित्त, शिरूर येथील फार्मसी कॉलेज मध्ये कार्यक्रम पार पडला. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र थिटे, सचिव धनंजय थिटे यांनी उपस्थितांना आपल्या मनोगतातून मार्गदर्शन करत, जागतिक औषध निर्माता दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बी. फार्मसी कॉलेज चे प्राचार्य डॉ. बाहेती व डी. फार्मसी चे प्राचार्य डॉ. शहा यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमानिमित्त ब्रिटॉन फार्मा चे संचालक अभय दर्डा यांनी विद्यार्थ्यांना रिटेल मेडिकल शॉप व्यतिरिक्त उपलब्ध असलेल्या करिअर संधींबद्दल मार्गदर्शन केले. तर बच्चुभाई ओसवाल (अध्यक्ष एसएमसीडीए, पश्चिम विभाग) यांनी आपल्या मनोगतातून जागतिक फार्मसिस्ट दिनाचे महत्त्व स्पष्ट केले.


तसेच सीएपीडी, पुणे चे अध्यक्ष सुशील शहा यांनी ‘विविध क्षेत्रांमध्ये फार्मसिस्ट ची असलेली गरज, तसेच ऑनलाईन फार्मसी मुळे होणारे नुकसान’ याबद्दल मार्गदर्शन केले. तर अन्न व औषध प्रशासन पुणे चे सहाय्यक आयुक्त दिनेश खिंवसरा यांनी, ‘प्रशासनामध्ये असलेल्या विविध संधी’ या विषयावर मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उकलही केली. या दिनानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमार्फत, शिरूर शहरातून रॅली काढत ‘औषधांच्या गैरवापरामुळे होणारे दुष्परिणाम’ या विषयावर पथनाट्यही सादर करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी शिरूर शहरातील बाबाजी गलांडे, चोथमल कोठारी, पुष्पराज कोळपकर, हनुमंत गाडे, सचिन गाडे, अजिंक्य थोरात, आकाश लंके, ज्ञानदेव सूर्यवंशी, दीपक ताथेड, संदीप साठे आदी व्यावसायिक उपस्थित होते. यावेळी ज्ञानदेव सूर्यवंशी यांचा वरिष्ठ फार्मसिस्ट म्हणून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजया पडवळ व प्रा. मोनाली परभने यांनी केले. तर प्रा. कारखिले यांनी आभार मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *