जुन्नर मधील आत्महत्याग्रस्त आर्थिक मदत करून त्यांचे कर्ज माफ करा – किसान सभा

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
२४ सप्टेंबर २०२२

नारायणगाव


 राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. दशरथ लक्ष्मण केदारी असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत या शेतकऱ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. या शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत करून त्याचे वरील असलेले सर्व कर्ज माफ करावे अशी मागणी किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे.

आत्महत्येपूर्वी दशरथ यांनी एक चिठ्ठी लिहिली. या चिठ्ठीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मोदी सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव न दिल्याची खंत त्यांनी या चिठ्ठीत व्यक्त केली आहे. कांदा-टोमॅटोचे ढासळणारे दर, कोरोना-अतिवृष्टीचं संकट आणि फायनान्स कंपन्या आणि पतपेढीवाले हप्ता भरण्यासाठीचा लावलेला तगादा या सर्वांना कंटाळले असल्याचे त्यांनी चिठ्ठीत लिहले आहे. ‘आम्ही भीक मागत नाही. अनेक संकटांचा सामना करत आम्ही शेतीत विविध पिकं लावतो, हा एक जुगाराचा प्रकारच आहे. अशा प्रकारांमुळं मी जीवनास कंटाळलो आहे. म्हणून आज मी आत्महत्या करतोय. आम्हाला आमच्या हक्काचा बाजार भाव द्या.’, अशी मागणी त्यांनी मोदी सरकारकडे केली.

दशरथ लक्ष्मण केदारी

या सर्व घटना विविध प्रसार माध्यमांमधून प्रसारित झाल्या आहेत. यामध्ये संबधित शेतकरी त्याच्या आत्महत्येला केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांना जबाबदार धरत आहे. किसान सभा या संघटनेने सातत्याने केंद्र आणि राज्य शासनाच्या या भांडवलदार धार्जिण्या आणि शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध केला असून शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागु कराव्यात. या सारख्या शेतकरी हिताच्या बाजुच्या मागण्या सरकार दरबारी मांडल्या आहेत. सरकारच्या नाकर्तेपणाच्या भूमिकेने आतापर्यंत विदर्भ-मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा आणि शेतीवरील वारंवार येणाऱ्या अरिष्टाला कंटाळून आत्महत्या केलेल्या साऱ्या जगाने पाहिलेल्या आहेत. परंतु आता पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरीही शेतमालाला हमीभाव नाही आणि त्यामुळे घेतलेले कर्ज फेडता येईना म्हणून आत्महत्या करतोय ही सरकारला मोठी चपराक असून, शिक्षित शेतकऱ्याने देशाचे पंतप्रधान यांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देताना त्यांच्या या धोरणाचा निषेध करून आत्महत्या केली आहे.

या अतिशय दुखद घटनेने संबंधित शेतकऱ्याचे सर्व कुटुंब बेसहारा झालेले असून त्यांच्या कुटुंबियांना उदरनिर्वाहासाठी राज्य व केंद्र शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी. त्याच बरोबर संबंधित शेतकऱ्यावर असलेले कर्ज पूर्णपणे माफ करावे अशी मागणी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत निवासी तहसिलदार सचिन मुंढे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. या वेळी किसान सभेचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. अमोल वाघमारे, जिल्हा सचिव विश्वनाथ निगळे, जुन्नर तालुका अध्यक्ष माधुरीताई कोरडे, उपाध्यक्ष सरपंच मुकुंद घोडे, कार्याध्यक्ष कोंडीभाऊ बांबळे, सहसचिव नारायण वायाळ आदी उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *