आळंदीमध्ये विजेचा लपंडाव 

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२४ सप्टेंबर २०२२

आळंदी


मागील दीड महिन्यांपासून वीजपुरवठा खंडित होत असल्याने आळंदीत विजेचा लपंडाव सुरू आहे. पूर्वसूचना न देत वीज जात असल्याने व्यापारी वर्ग तसेच घरगुती ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरातील एका ठिकाणी वीजपुरवठा करणारी मुख्य केबल तुटली आणि साडेसातच्या दरम्यान शहरात अंधार झाला. रात्री उशिरा वीजमंडळाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करून वीजप्रवाह कार्यान्वित केल्याने पुन्हा वीज आली. यापूर्वीही शहरात दररोज कुठे ना कुठे हमखास वीज जातेच. भारनियमन नसतानाही आळंदीसारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी महावितरणचा भोंगळ कारभारामुळे शहरातील नागरिक त्रस्त आहेत.

रात्रीच्या वेळी बाहेरगावाहून, परराज्यांतून टुरिस्ट बस येत असतात, यामुळे पद्मावती रस्ता, वडगाव रस्ता, चाकण रस्ता, देहूफाटा, गावठाणातील प्रदक्षिणा रस्त्यावरील अंधारामुळे यात्रेकरूंचीही गैरसोय होत आहे. तसेच व्यापारी वर्ग, विद्यार्थ्यांची वीजपुरवठा नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. याबाबत आळंदीतील वीजमंडळ कार्यालयात जावे तर तेथे अधिकारी, कर्मचारी असतीलच असे नाही. आळंदीतील महावितरणच्या कार्यालयातील अभियंता एस. एन. धापसे हे ही आठवड्यातून दोन तीनदाच दिसतात. कार्यालयात आले तरी काही वेळात गायब होतात. यामुळे कर्मचाऱ्यांना धाक राहत नाही. कर्मचारी मोबाईलवर संपर्क केला तर थातूर मातूर उत्तरे देतात.महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे आणि अधिकाऱ्यांवर अंकुश नसल्याने गेल्या दीड महिन्यात आळंदीकरांना खंडित वीजपुरवठ्याचा वारंवार सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. आळंदीत व्यावसायिक तसेच सार्वजनिक कार्यक्रमांसाठी थेट आकडे लावून वीज चोरण्याचे प्रमाणही वाढले आहे. अधिकाऱ्यांचे मोबाईल कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर डायव्हर्ट केले जात असल्याने नागरिकांनी तक्रार करायची कुठे असा प्रश्न आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *