मुंबईतील प्रकल्पाच्या नोकऱ्यांसाठी चेन्नईला मुलाखत, महाराष्ट्रातील तरुणांचे आर्थिक खच्चीकरण सुरू – आदित्य ठाकरे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२१ सप्टेंबर २०२२


वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क प्रकल्पासारखे मोठे प्रकल्प परराज्यात गेल्याची माहिती समोर आणल्यानंतर आता शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. मुंबईतील वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी नोकर भरतीसाठीच्या मुलाखती चेन्नईमध्ये होणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आणली. लोकांच्या हिताचं काम करणाऱ्या मविआ सरकारला पाडून आलेल्या या सरकारने यावर स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. भूमीपुत्रांवर अन्याय मुख्यमंत्र्यांच्या संगनमताने होतोय का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

वर्सोवा बांद्रा सी लिंकचे काम अनेक दिवसांपासून बंद होते. आमच्या काळातही यासंदर्भात बैठका घेण्यात येत होत्या. हा पहिला उड्डाण पूल असणार आहे, ज्यावर चार टोल बसवण्यात येणार आहे. हे काम अनेक दिवसांपासून बंद असल्याने या कामाचे कंत्राटदार बदलण्यात आले आहे. मात्र, मी अनेक दिवसांपासून बोलतोय की आपल्या राज्यात प्रत्येक ठिकाणाहून नोकरीसाठी लोक येतात. कालपरवा माझ्या माहितीत एक धक्कादायक प्रकार आला आहे. वर्सोवा बांद्रा सी लिंकची कंपनी बदलल्यानंतर दुसऱ्या कंपनीकडे याचे काम देण्यात आले. या नवीन कंपनीने नोकरीसाठी जाहिरात काढली आहे. मात्र, याच्या मुखाखती चेन्नईत होत आहेत. हा प्रकल्प आपल्या राज्यात होणार आहे. मग आपल्या राज्यातल्या मुलांना नोकरीची संधी का दिली जात नाही. बाहेर राज्यात का मुलाखती घेतल्या जातात” , असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.हा एका कंपनीपुरता विषय जरी असला, तरी महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. या सर्व प्रकारातून महाराष्ट्रातील तरुण तरुणींचे आर्थिक खच्चीकरण सुरू आहे”, असेही ते म्हणाले.

आदित्य ठाकरे म्हणाले की, एमटीएचएलची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. आमच्या वेळेस 80 टक्के काम पूर्ण झालं होतं. आता ते म्हणताय 63 टक्के काम पूर्ण झालं आहे. वर्सोवा वांद्रे सी लिंकचे काम मध्ये बंद पडलं होतं. तिथे चारटोल लादले जाणार आहेत. कंपनीने कॉन्ट्रॅक्टर बदलले आहेत, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना काहीच माहिती नाही.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *