हे गद्दारांचं सरकार आहे, बेईमानीचं सरकार आहे,घटनाबाह्य सरकार; आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१६ सप्टेंबर २०२२


शिवसेना आमदार आदित्य ठाकरे सध्या रत्नागिरी दौऱ्यावर असून यादरम्यान शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांमध्ये टीकास्र सोडलं आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करतानाच त्यांनी शिंदे गटावर पुन्हा एकदा गद्दारी केल्याची टीका केली आहे. मात्र, त्याचवेळी आदित्य ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही तोंडसुख घेतलं आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या या सभेवरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी करून बाहेर पडलेल्या ४० आमदारांवर तोंडसुख घेतलं. “तुमच्यात हिंमत होती तर समोरून यायला पाहिजे होतं. असं गद्दारांसारखं मागून पाठीत वार करायला नको होता. म्हणे आमच्या बंडाची नोंद ३३ देशांनी घेतली. पण तुमच्या बंडाची नाही, गद्दारीची नोंद ३३ देशांनी घेतली आहे. महाराष्ट्रानं तर चांगलीच नोंद घेतली आहे. यांना उठाव करायचा असता, तर जागेवरच उभे राहिले असते. पण हे पळून गेले, असं आदित्य ठाकरे म्हणाले. मी आतापर्यंत सतत सांगत आलेलो आहे की हे गद्दारांचं सरकार आहे, बेईमानीचं सरकार आहे, घटनाबाह्य सरकार आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठित खंजीर खुपसणारं सरकार आहे. हे सिद्ध करून दाखवतो असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर चांगलीच फटकेबाजी केली आहे. आम्ही जेव्हा 50 खोके एकमद ओकेच्या घोषणा देत होतो, तेव्हा हेच गद्दार आमदार आम्हाला येऊन विचारत होते की तुम्हाला 50 खोके पाहिजेत का? त्यामुळे त्यांनीच मान्य केलं आहे आपण 50 खोके घेतलेत. असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावलाय.

आपली चूक एवढीच झाली की आपण त्यांना लायकीपेक्षा जास्त दिलं. त्यांना अपचन झालं आणि हाजमोला खायला त्यांना पलीकडे जावं लागलं. हे ४० लोक गद्दारीला बंड, क्रांती समजायला लागले आहेत आणि निर्लज्जपणे सगळीकडे फिरायला लागले आहेत, असा टोला आदित्य ठाकरेंनी यावेळी लगावला. मी देवेंद्र फडणवीसांच्या जागी असतो, तर मी माझा स्वाभिमान सांभाळला असता. मी माझ्या पक्षाची प्रतिमा सांभाळली असती. या सरकारमधून बाहेर पडलो असतो आणि पुन्हा एकदा निवडणुकांना सामोरा गेलो असतो. या ४० लोकांसोबत बसलो नसतो,असं आदित्य ठाकरे म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *