राज ठाकरे हाजिर हो… औरंगाबाद जिल्हा न्यायालयाचे आदेश

अतुल परदेशी
मुख्य संपादक
२५ ऑगस्ट २०२२


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्हा न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. औरंगाबाद येथील प्रथमवर्ग न्याययदंडाधिकारी यांनी सिटी चौक पोलीस स्टेशन अतंर्गत दाखल गुन्ह्यासंदर्भात राज ठाकरें यांना ही नोटीस बजावली आहे. 1 मे रोजी औरंगाबादेत झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. सिटी चौक पोलिसांनी आज औरंगाबाद जिल्हा न्यायालयात यासंदर्भातील आरोप पत्र दाखल केलं. त्यानंतर आता जिल्हा न्यायालयाने राज ठाकरे यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

1 मे रोजी झालेल्या राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेपूर्वी पोलिसांनी काही नियम आणि अटी घालून दिल्या होत्या. त्यातील काही अटींचं उल्लंघन झाल्याचं पोलिसांच्या अहवालात आढळून आलं. या सभेतील गर्दी पोलिसांनी सांगितलेल्या मर्यादेपेक्षा जास्त होती. तसेच सभेत भडकाऊ भाषण केले, आवाजाची मर्यादा आलांडली, असे आरोपही पोलिसांनी केले आहेत. औरंगाबाद पोलिसांनी सभेचं पूर्ण फुटेज तपासल्यानंतर गृह मंत्रालयाला यासंदर्भातील अहवाल पाठवला होता. तेथे चर्चा झाल्यानंतर राज ठाकरेंविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कलम 116,117,153 भादविसह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 प्रमाणे हा गुन्हा दाखल झालेला आहे. आज या प्रकरणी जिल्हा कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलं….मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यनोंदणीला नुकतीच सुरुवात झाली आहे. मंगळवारी मुंबईत राज्यभरातील मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधून राज ठाकरे यांनी आक्रमक भाषण केलं. यावेळी मनसेची भूमिका घरोघरी पोहोचवण्याचा सल्ला राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला. त्यानंतर आज पुण्यात ते पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत आहेत. पुण्यात मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचं ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केलं.

शिंदेसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना विरुद्ध युती हा सामना जास्त रंगण्याची चिन्ह आहेत. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र मंगळवारी राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणातील मुद्दे पाहता, ते स्वबळावर निवडणुका लढतील, अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. महाराष्ट्रभर पसरलेल्या कार्यकर्त्यांना संबोधताना राज ठाकरे म्हणाले, बाबांनो हात जोडतो, अॅडजस्टमेंट करून निवडणुका लढवू नका. त्यामुळे पक्षाचे आणि स्वतःचे राजकीय करियरही धोक्यात येऊ शकते. सद्या निर्माण झालेल्या राजकीय स्थितीचा फायदा घ्या, आगामी काळात येणारी कोणतीही निवडणूक अत्यंत ताकतीने लढा. पक्ष तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *