राकेश झुनझुनवाला यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे हेच ते महत्वाचे प्रसंग

अतुल परदेशी
मुख्य संपादक
१४ ऑगस्ट २०२२


आजचा दिवस उद्योग जगतासह शेअर बाजारासाठी वाईट बातमी घेऊन आला आहे. भारताचे वॉरेन बफे म्हणून ओळखले जाणारे शेअर बाजारातील बिग बूल राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांनी वयाच्या 62 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या विमान वाहतूक कंपनीच्या विमानाने नुकतेच पहिले उड्डाण केले होते. त्यावेळी त्यांनी व्यवसायात धोके असले तरी तो कसे यशस्वी करता याचे एक उदाहरण तयार करायचे असल्याचा मनोदय व्यक्त केला होता. मुंबई-अहमदाबाद या मार्गावर त्यांच्या अकासा या एअरलाईन्सने पहिले टेक-ऑफ केले होते. त्यानंतर त्याच्या विस्ताराची योजना तयार करण्यात आली होती. पण त्यापूर्वीच झुनझुनवाला हे स्वप्न उराशी बाळगून आपल्यातून निघून गेले. अनेक तरुण गुंतवणूकदारांचे ते आदर्श होते. त्यांच्या बिझनेस टीप्ससाठी आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीचा मंत्र मिळवण्यासाठी गुंतवणूकदार सातत्याने त्यांना फॉलो करायचे. सोशल मीडियाच्या उदयानंतर आणि युट्युबच्या जमान्यात अनेक नव गुंतवणूकदारा त्यांना रोज फॉलो करायचे. त्यांनी नेमकी कुठे आणि किती गुंतवणूक केली. त्यामागील त्यांचे प्रयोजन आणि कारणे शोधली जायची. त्यांनी केलेली गुंतवणूक किती पटीत वाढली याचा मागोवा घेतला जायचा. ते ज्या शेअर्सला हात लावत त्याचे सोने व्हायचे असा एक रिवाजच जणू झाला होता. तुमचा विश्वास बसणार नाही पण झुनझुनवाला केवळ 5 हजार रुपये घेऊन शेअर बाजारात उतरले होते आणि आज त्यांची एकूण संपत्ती 40 हजार कोटी रुपये आहे. त्यांच्या जीवन प्रवासावर एक नजर राकेश झुनझुनवाला यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे हेच ते महत्वाचे प्रसंग.

राकेश झुनझुनवाला यांचा जन्म 5 जुलै 1960 रोजी मुंबईत झाला. झुनझुनवाला हे भारतातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार होते. केवळ 5000 रुपये घेऊन शेअर बाजारात दाखल झालेल्या झुनझुनवाला यांची गणना देशातील आघाडीच्या श्रीमंतांच्या यादीत होते. त्याची यशोगाथा एखाद्या परीकथेहून कमी नाही.झुनझुनवाला यांचे वडील आयकर विभागात अधिकारी होते आणि त्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक केली होती. त्यांच्या वडिलांमुळे राकेश झुनझुनवाला यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याची प्रेरणा मिळाली.वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर राकेश झुनझुनवाला यांनी 1985 मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियामधून चार्टड अकाऊंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला. वडिलांना वाटले हे त्यांचा व्यवसाय करतील. पण झुनझुनवाला यांनी शेअर मार्केटचा रस्ता धरला. त्यासाठी त्यांनी वडिलांकडे पैसे मागितले. पण त्यांनी रक्कम देण्यास नकार दिला. वडिलांनी मंत्र दिला की, आधी स्वतः पैसे कमव आणि नंतर शेअर बाजारात गुंतवणूक कर. वडिलांचा हा मंत्र त्यांनी आयुष्यभर पाळला. राकेश झुनवाला यांनी 2003 साली टाटा समूहाच्या टायटन कंपनीत गुंतवणूक केली. या एका शेअरने त्यांचे नशीब पालटल्याचे बोलले जाते. त्यांनी सहा कोटी शेअर्स अवघ्या 3 रुपये प्रति शेअर्सप्रमाणे खरेदी केले आणि या शेअर्सनी त्यांना भारतीय शेअर बाजारात बिग बुल ठरवले. आजही या शेअर्समध्ये त्यांचा मोठा वाटा आहे आणि हा शेअर किंमती मानण्यात येतो. आज त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक कंपन्यांचे शेअर्सचा समावेश आहे. यामध्ये सेल, टाटा मोटर्स, टाटा कम्युनिकेशन्स, ल्युपिन, टीव्ही18, डीबी रियल्टी, इंडियन हॉटेल्स, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स, फेडरल बँक, करूर वैश्य बँक, एस्कॉर्ट्स लिमिटेड, टायटन कंपनी या कंपन्यांचा समावेश आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *