सच्चा शिवसैनिकासाठी धावले एकनाथ शिंदे, तातडीने धाडली २ लाखांची मदत

अतुल परदेशी
मुख्य संपादक
१३ ऑगस्ट २०२२


शिवसेना आणि शिंदे गटाकडून राज्यांमध्ये रोज एकमेकांना धक्के दिले जात असताना परभणी महानगरपालिकेचे शिवसेनेचे प्रमाणिक सदस्य चंदू शिंदे यांच्या मदतीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावले आहेत. चंदू शिंदे यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांनी दोन लाखाची मदत केली आहे. ही मदत शिंदे गटाचे कोकण विद्यापीठाचे कार्यकारणी सदस्य प्रवीण देशमुख यांच्या प्रयत्नामुळे मिळाली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात आलेल्या या मदतीमुळे चंदू शिंदे यांच्या कुटुंबियांना आधार मिळाला आहे.

सामान्य परिस्थितीमध्ये काम करत चंदू शिंदे यांनी आपले जनमत तयार केले. अशा सच्चा शिवसैनिकावर अचानक संकट कोसळले. डोक्यातील एक नस तुटल्याने मेंदूला दुखापत झाली. रात्रीतून चंदूवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. अशावेळी डॉ. गोविंद रसाळ व मेंदूतज्ञ डॉ. एकनाथ गनाळे यानी चंदूवर रात्रीच एक शस्त्रक्रिया केली. दुसरी शस्त्रक्रिया सकाळी अकरा वाजता करावी लागली. या दोन शस्त्रक्रियेचा खर्च चंदूच्या कुटूंबाला न झेपणारा होता. या कडवट शिवसैनिकाच्या मदतीला आ. डॉ. राहूल पाटील व काही मित्र परिवार धावून आले. त्यानंतरही चंदूच्या उपचाराचा खर्च हा वाढतच होता. या दरम्यान राज्यातील शिवसेनेत दोन गट पडले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी शिंदे समर्थक प्रविण देशमुख यांनी चंदूच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आर्थिक मदतीची मागणी केली. नुसती मागणीच नाही केली तर प्रविण देशमुख यांनी आग्रह देखील केला.

चंदू शिंदेला ११ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री सहाय्यक निधीतून दोन लाखाची मदत देखील पाठविण्यात आली.ही मदत अनन्य हॉस्पीटलला मिळाली असल्याची माहिती डॉ. गोविंद रसाळ यांनी दिली. आज ही मदत देखील चंदूच्या कुटूंबीयांना आधार बनली आहे. मनपा सदस्यांकडून सह्यांची मोहिम राबवली जात आहे. शेवटच्या महिन्याचे मानधन हे चंदूला देण्याचा निर्णय सर्व मनपा सदस्यांनी घेतला आहे. रुग्णालयातून चंदूला स्वतःच्या घरी हलविण्यात आले असून प्रकृतीमध्ये झपाट्याने सुधारणा होत आहे. एक चांगली शस्त्रक्रिया परमणीत झाल्याने चंदूचे प्राण वाचले आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *