शिरूर चे भाजपचे माजी आमदार कै. बाबुराव काशिनाथ पाचर्णे काळाच्या पडद्याआड

रवींद्र खुडे
विभागीय संपादक 
११ ऑगस्ट २०२२

शिरूर


शिरूर तालुक्याच्या राजकारणातील एक जुना जाणता राजकारणी नेता, माजी आमदार व शिरूर हवेलीच्या जनतेने ज्यांना लोकनेते अशी पदवी बहाल केलेली होती, असे माजी आमदार कै. बाबुराव काशीनाथ पाचर्णे, यांचे गुरुवार दि. ११ ऑगस्ट २०२२ रोजी, रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेच्या दिवशी दुपारी सव्वाबारा वाजता च्या सुमारास, दुःखद निधन झाले असून, ते विधान सभेवर भाजप च्या तिकिटावर दोनदा निवडून गेलेले होते. त्यांच्या पछ्यात पत्नी, चिरंजीव माजी जी प सदस्य राहुलदादा पाचर्णे, एक विवाहित मुलगी, नातवंडे, बहिणी, भाऊ व एकत्र कुटुंबातील भावंडे असा मोठा परिवार असून, लोकांनी त्यांना लोकनेते अशी पदवी दिलेली होती.

भाजप च्या तिकिटावर दोन वेळा आमदार म्हणून निवडून गेलेले बाबुराव काशिनाथ पाचर्णे, हे मूळचे शिरूर शहराला लागून असलेल्या तरडोबाच्या वाडीचे. एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. सुरुवातीपासूनच त्यांना राजकारणाची आवड असल्याने, त्यांनी प्रथम निवडणूक लढविली ती १९७८ साली, तत्कालीन शिरूर ग्रुप ग्राम पंचायतची. त्यात ते सदस्य म्हणून निवडून आले होते. त्या नंतर त्यांना संधि मिळाली ती शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये. त्यांनी १९८५ मध्ये बाजार समितीचे निवडणूक जिंकत आपल्या कुशल नेतृत्वाने सभापती पदही मिळविले. १९८५ ते १९९३ पर्यंत सलग ८ वर्ष त्यांनी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाची धुरा सांभाळली. त्यानंतर मात्र त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करत १९९५ साली अपक्ष म्हणून निवडणूक लढविली, परंतु त्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे जिल्हा परिषदेकडे त्यांनी मोर्चा वळवून, १९९७ साली पुणे जिल्हा परिषदेवर ते निवडून गेले व १९९७ ते १९९९ पर्यंत त्यांनी जी प सदस्य म्हणून काम पाहिले.परंतु १९९९ मध्ये लागलेल्या आमदारकीच्या निवडणुकीसाठी त्यांनी काँग्रेस कडून संधी घेतली, परंतु पुन्हा आमदारकीसाठी त्यांना अपयशी व्हावे लागले. मात्र २००४ च्या आमदारकीच्या निवडणुकीत त्यांनी भाजप कडून उमेदवारी मिळवत आमदार होण्याची संधी मिळविली. २००९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला परंतु त्यांना शिरूर मधून उमेदवारी मिळाली नाही.