बच्चू कडू यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

अतुल परदेशी
मुख्य संपादक
१० ऑगस्ट २०२२


राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून यामध्ये अपक्षांना स्थान देण्यात आलेलं नाही. यामुळे शिंदे गटाला पाठिंबा देणारे बच्चू कडू नाराज असल्याची असतानाच ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. नंदनवन बंगल्यावर ही भेट झाली. या भेटीनंतर बोलताना बच्चू कडू यांनीदेखील थोडी नाराजी असल्याचं कबूल केलं आहे. पूर्ण मंत्रीमंडळ विस्तार होईपर्यंत वाट पाहू असं ते म्हणाले आहेत.“नाराजी नाही असं नाही, थोडी नाराजी असतेच. पण ती इतकीही नाही की, आपलं घर सोडून दुसऱ्या पक्षात निघून जाऊ. ही क्षणिक नाराजी आहे. अजून पूर्णपणे मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. पूर्ण विस्तार झाला असता आणि संधी मिळाली नसती तर गोष्ट वेगळी असती,” असं बच्चू कडू म्हणाले आहेत.“मी फक्त मंत्रिपदासाठी शिंदे गटाला पाठिंबा दिला नव्हता. काही मुद्द्यांच्या आधारे पाठिंबा दिला होता, जर ते मुद्दे विचारात घेतले नाही तर वेगळा विचार करु,” असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. आश्वासन देण्यात आलं होतं, त्यामुळेच आम्ही मागणी करत आहोत, अन्यथा केलीही नसती असंही ते म्हणाले.

“एकनाथ शिंदे यांनी आम्ही तुम्हाला मंत्री करु असं आश्वासन देत शपथ घेतली होती. पहिल्या यादीत नाव नसेल, तर अखेरच्या यादीत तरी असेल,” अशी आशा बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. दुसरी यादी अडीच वर्षानंतर येऊ शकते असंही त्यांनी सांगितलं. राजकारणात काहीही होऊ शकतं, इथे दोन आणि दोन चार नाही तर पाच होतात असंही ते म्हणाले. मंत्रिमंडळात महिलांना संधी दिलेली नसल्याने टीका होऊ लागताच पुढील आठवडय़ात आणखी एक छोटेखानी विस्तार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम निर्णय येत्या शुक्रवारी अपेक्षित असून, केंद्रीय निवडणूक आयोग सप्टेंबरमध्ये निर्णय देण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवरात्रीदरम्यान पुढील विस्तार होईल व दोन मंत्रीपदे रिक्त ठेवली जातील, अशी शक्यता आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *