भाजपमधील दिग्गजांना संधी, तर शिंदेंकडून ‘ठाकरे पॅटर्न’, पाहा ते १८ मंत्री

अतुल परदेशी
मुख्य संपादक
०९ ऑगस्ट २०२२


एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठी बंडाळी केल्यानंतर भाजपसोबत युती करत राज्यात सरकार स्थापन केलं. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. मात्र, गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण राज्याला प्रतीक्षित असलेल्या शिंदे गट आणि भाजपचं मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज होत आहे. भाजपकडून दिग्गज नेत्यांना संधी देण्यात आली आहे. तर शिंदे गटाकडून मात्र ठाकरे पॅटर्न राबवण्यात आला असून ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील बहुतेक नेत्यांना संधी देण्यात आली आहे. आज एकूण १८ जण मंत्रिपदाची शपथ घेत आहेत.भाजपकडून ९ दिग्गजांना संधी देण्यात आली आहे. भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, विजयकुमार गावित यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर शिंदे गटाकडून दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, संदीपान भुमरे यांची कॅबिनेट मंत्रिपदासाठी शपथ घेतील. दोन्ही बाजूंकडून प्रत्येकी नऊ असे एकूण १८ मंत्री शपथ घेणार असल्याचे समजते. हे सर्व मंत्री कॅबिनेट मंत्री होणार असल्याची माहिती आहे.

शिंदे गट 
शंभूराज देसाई
अब्दुल सत्तार
दादा भुसे
दीपक केसरकर
उदय सामंत
गुलाबराव पाटील
संदीपान भुमरे
तानाजी सावंत
संजय राठोड

भाजप
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
मंगलप्रभात लोढा
गिरीश महाजन
राधाकृष्ण विखे पाटील
सुरेश खाडे
रविंद्र चव्हाण
विजयकुमार गावित
अतुल सावे

न्यायलयात सुनावणी सुरू असल्याने, तसेच काही खात्यांचा तिढा सुटत नसल्याने मंत्रीमंडळाचा विस्तार लांबला होता. शिंदे गटाला गृहखाते हवे होते. पण, भाजप गृहखात्यासाठी अडून बसला होता. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्ताराचा तिढा सुटत नव्हता. अखेर शिंदे यांनी दोन पावले मागे जात भाजपला गृहखाते आणि अर्थखाते दिल्याने मंत्रीमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला असल्याचे समजते. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत शिंदे गटाचे प्रयत्न सुरू असून, कोणाला नेमकी कोणती खाती मिळणार आहेत हे समजायला बुधवारचा दिवस उजाडणार असल्याचे समजते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *