एकनाथ शिंदेंच्या पुतण्याला जुगार खेळताना अटक

अतुल परदेशी
मुख्य संपादक
०९ ऑगस्ट २०२२


एकनाथ शिंदे यांचा पुतण्या महेश शिंदे याला जुगार खेळत असताना अटक करण्यात आल्याचे समजते. मीरारोडच्या जीसीसी क्लबमधील एका खोलीत महेश शिंदे जुगार खेळत होता. त्यावेळी पोलिसांनी क्लबवर धाड टाकून महेश शिंदेसह १० जणांना अटक केली. ही माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. तब्बल ३५ दिवसांनंतर शिंदे-फडणवीस सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार पार पडत आहे. कालच शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांचा टीईटी घोटाळ्याशी संबंध असल्याची माहिती पुढे आली होती. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्यासाठी आनंदाचा क्षण असलेल्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी त्यांच्या पुतण्याला अटक झाल्याने शिंदे सरकारसाठी आणखी एक अपशकून घडला आहे.

दैनिक सामना’च्या माहितीनुसार, मीरारोडमधील जीसीसी क्लब या हॉटेलमध्ये बेकायदेशीररीत्या जुगार खेळला जात असल्याची माहिती मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अविराज कुरहाडे यांनी या हॉटेलवर छापा टाकला. हॉटेलमधील ७९४ क्रमांकाच्या रूममध्ये १० जण जुगार खेळत होते. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतण्या महेश शिंदे याचाही समावेश होता. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले. मात्र नंतर त्यांना चौकशी करून सोडण्यात आले. परंतु या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू झाल्यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी महेश शिंदेसह सर्व जुगार खेळणाऱ्यांना अटक केली.मंगळवारी ऑगस्ट क्रांतिदिनाचा मुहूर्त साधत होत असलेल्या या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील यांची; तर शिंदे गटाकडून दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, संदीपान भुमरे यांची कॅबिनेट मंत्रिपदासाठी नावे निश्चित झाली आहेत. राजभवनात सकाळी या मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. मंत्रीमंडळात नव्या जुन्या चेहऱ्यांना संधी देत समतोल साधण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न असून, दोन्ही बाजूंकडून प्रत्येकी नऊ असे एकूण १८ मंत्री शपथ घेणार असल्याचे समजते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *