कपर्दिकेश्वर चे हर हर महादेवाच्या गजरात भाविकांचे दर्शन

कैलास बोडके
बातमी प्रतिनिधी 
०८ ऑगस्ट २०२२


अवघ्या शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या ओतूर (ता. जुन्नर )येथील कपर्दिकेश्वर मंदिरात शिवभक्तांनी हर हर महादेवच्या गजरात दर्शन घेतले, पहाटे हेमंत जयप्रकास डुंबरे व मनोज बबन ढमाले यांनी सपत्नीक पूजा, अभिषेक व महाआरती केल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आल्याची माहिती देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे यांनी दिली.

गतकाळात कोरोनाच्या संकटामुळे ओतूर येथे श्रावण महिन्यात भरणाऱ्या यात्रेत शिवभक्तांना दर्शनासाठी हजेरी लावता आली नाही मात्र यावर्षी कोरोनाचे संकट दूर झाल्याने दुसऱ्या सोमवारी यात्रेला भाविकांची गर्दी पहायला मिळाली. दुसरा श्रावणी सोमवार दर्शविणाऱ्या शिवलिंगावर दोन कोरड्या तांदळाच्या कलात्मक पिंडी बनविण्यात आल्या होत्या,स्विमिंग व मॉर्निंग वॉक ग्रुपने ५०० किलो खिचडी तसेच स्व.चैतन्य डुंबरे मित्र मंडळाने १५० किलो खिचडीचे भाविकांसाठी महाप्रसाद म्हणून वाटप केले.यात्रेत विविध मिठाई पदार्थ,खेळणी,आकाश पाळणे, प्रसाद, बेलफुलांची दुकाने थाटण्यात आली होती . परंपरेने कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेच्या वतीने पांढरी मारुती मंदिराच्या खुल्या व्यासपीठावर भजन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले,स्पर्धेत पंचक्रोशीतील भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला. यंदा या भागात पावसाचे प्रमाण व्यवस्थित असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. संपूर्ण ओतूर गाव व परिसर भक्ति सागरात न्हाऊन निघाला.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या सूचनेनुसार ओतूर पोलीस स्टेशनच्यावतीने पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल केरूरकर आणी आकाश शेळके यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता तर ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. यादव शेखरे व डॉ. श्रीहरी सारोक्ते यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांना आरोग्य सुविधा पुरविण्यात आली आहे.