शिवसेना खासदार संजय राऊत यांचा तुरुंगातला मुक्काम वाढला, २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

अतुल परदेशी
मुख्य संपादक
०८ ऑगस्ट २०२२


शिवसेना खासदार संजय राऊत यांचा तुरुंगातला मुक्काम वाढला आहे. २२ ऑगस्टपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. ते इतके दिवस ईडी कोठडीत होते. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. ३१ जुलैला रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. आज संजय राऊत यांना दुसऱ्यांदा सुनावण्यात आलेली ईडी कोठडी संपत आल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.पीएमएलए कायद्यानुसार, संजय राऊत यांना आज पुन्हा ईडी कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडीत पाठवलं जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

पण न्यायालयाने संजय राऊत यांना काहीसा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांना २२ ऑगस्टपासून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे २२ ऑगस्टनंतर संजय राऊत यांना जामीन मिळवण्यासाठी अर्ज करता येणार आहे.आजपासून संजय राऊत यांचा मुक्काम मुंबईतील आर्थर रोड कारागृहात असणार आहे. संजय राऊत ईडी कोठडीत असताना त्यांना काही सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. प्रकृतीच्या कारणास्तव राऊतांना त्याच प्रकारच्या सुविधा कारागृहात पुरवल्या जाव्यात, अशी मागणी संजय राऊत यांच्या वकिलांनी केली आहे. घरचं जेवणं, औषधं आणि हवेशीर खोली मिळावी, अशी मागणी राऊतांच्या वकिलांनी केल्याची माहिती समजत आहे.शनिवारी (६ ऑगस्ट) शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ईडीने ८ तासांहून अधिक काळ चौकशी केली आहे. यावेळी ईडीने त्यांचा सविस्तर जबाब नोंदवला आहे. “काहीही झालं तरी आम्ही शिवसेना पक्ष सोडणार नाही, आम्ही कायम उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहोत,” असं मत वर्षा राऊत यांनी ईडीच्या चौकशीनंतर व्यक्त केलं होतं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *