शिवसेना सत्तासंघर्ष प्रकरणाची सुनावणी १२ ऑगस्टला ; सोमवारची सुनावणी लांबणीवर

अतुल परदेशी
मुख्य संपादक
०८ ऑगस्ट २०२२


शिवसेनेतील सत्ता संघर्ष व फूट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी अपेक्षित असलेली सुनावणी लांबणीवर गेली असून आता ती १२ ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तारही लांबणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारची वैधता, विधानसभा अध्यक्षांची निवड व अन्य मुद्दय़ांवर शिवसेना नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरविण्याची त्यांची मागणी असून शिंदे यांनी विधानसभा उपाध्यक्षांची नोटीस रद्द करण्याची विनंती केली आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी व न्यायमूर्ती हिमा कोहली या त्रिसदस्यीय पीठापुढे याप्रकरणी प्राथमिक सुनावणी पूर्ण झाली असून या याचिका पाच किंवा अधिक सदस्यांच्या घटनापीठाकडे पाठवायच्या की नाही, यासह काही मुद्दय़ांवर सोमवारी निर्णय दिला जाईल, असे न्यायालयाने गेल्या सुनावणीच्या वेळी सूचित केले होते. पण न्यायालयाच्या पुढील आठवडय़ासाठी निश्चित झालेल्या कार्यसूचीत या याचिकांवरील सुनावणी १२ ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता सोमवारी सुनावणी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *