संजय राऊतांच्या अटकेनंतर शरद पवार गप्प का ?

अतुल परदेशी
मुख्य संपादक
०५ ऑगस्ट २०२२


पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत न्यायालयाने आणखी वाढ केली आहे. त्यामुळे राऊतांना आता ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीत राहावं लागणार आहे. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. मात्र, राऊतांना ईडीने अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सार्वजनिक प्रतिक्रिया आलेली नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार छगन भुजबळांना संजय राऊतांच्या अटकेनंतर शरद पवार गप्प का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते गुरुवारी (४ ऑगस्ट) नाशिकमध्ये माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.छगन भुजबळ म्हणाले, “असं काही नाही. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुप्रिया सुळेंनी लोकसभेत ईडीच्या कारवाईवर चर्चा घडवून आणली आहे. त्यात त्यांनी काही गोष्टी मांडल्या. ईडीकडून नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी यांची चौकशी सुरू आहे. त्याविषयी देखील त्या बोलल्या. या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षांसोबत आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते भाष्य करत आहेत.”“विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एक पत्रक काढत हा कायदा राक्षसी असल्याचं मत व्यक्त केलं आहे. अर्थात हा कायदा काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सरकारच्या काळातच बनवण्यात आला. त्याचे शिल्पकार त्यावेळचे केंद्रीय मंत्री व कायदेतज्ज्ञ चिदंबरम होते. त्यांनीच हा कायदा केला आहे. त्यामुळे भाजपाला तरी काय नावं ठेवणार? ते म्हणतील आम्ही हा कायदा केलाच नाही,” असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं.“ईडीला अधिकार देणाऱ्या कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा शिक्कामोर्तब केलं. त्यांनी यातील वेगवेगळी कलमं योग्य ठरवली आहेत. त्यामुळे अधिक कठीण झालं आहे. त्यामुळे सरकारी पक्ष व विरोधी पक्षांकडून यावर काय तोडगा काढला जातोय हे पाहावं लागेल,” असंही भुजबळांनी नमूद केलं.

राऊतांच्या जामिनावर बोलताना भुजबळ म्हणाले, “संजय राऊतांना मिळालेली ईडीची कोठडी हा न्यायालयीन कामकाजाचा भाग आहे. ईडीने न्यायालयात काही गोष्टी मांडल्या असतील. नेमक्या काय गोष्टी न्यायालयासमोर ठेवण्यात आल्या याबाबत मी ऐकलेलं नाही. मात्र, अधिक तपासासाठी न्यायालयाने संजय राऊतांना ईडी कोठडी सुनावली असावी.”पत्रकारांनी संजय राऊत यांची निर्दोष सुटका होईल का? असा प्रश्न विचारला. यावर भुजबळ म्हणाले, “संजय राऊत निर्दोष सुटतील की नाही याबाबत मला तसं काहीही सांगता येणार नाही. ईडीच्या प्रकरणात लवकर जामीन मिळत नाही आणि याची सर्वांना कल्पना आहे. त्यातूनही काही मार्ग निघाला तर आमच्या त्यांना शुभेच्छाच आहेत.”


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *