मोठ्या घडामोडीची चाहूल? सर्व कार्यक्रम रद्द करुन फडणवीस दिल्लीला रवाना

अतुल परदेशी
मुख्य संपादक
०५ ऑगस्ट २०२२


राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करुन दिल्लीला रवाना झाले आहेत. मागील दोन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु असलेल्या एकनाथ शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गटासंदर्भातील याचिकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस हे पक्षश्रेष्ठींना भेटण्यासाठी दिल्लीला रवाना झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दुपारच्या सुमारास फडणवीस हे त्यांच्या मुंबईतील ‘सागर’ बंगल्यावरुन विमानतळाच्या दिशेने रवाना झाले आहेत. आज दिल्लीमध्ये ते भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. फडणवीस यांच्या या अचानक ठरलेल्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं आहे.सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेला आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची आमदारकी रद्द झाली तर भाजपासमोर काय पर्याय आहेत यासंदर्भातील चर्चाही या बैठकीदरम्यान होऊ शकते असं म्हटलं जातंय. सत्ता स्थापनेसंदर्भातील पर्यायांचा न्यायालयीन निकालाच्या पार्श्वभूमीवर आढावा या बैठकींमध्ये घेतला जाऊ शकतो असं या विषायसंदर्भातील जाणकार सांगत आहेत.

महाराष्ट्रामध्ये सत्तेत आलेल्या शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये भाजपाचा वाटा सर्वात मोठा असून भाजपाचे १०६ आमदारांंच्या पाठिंब्यावर शिवसेनेच्या बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. या सत्ता स्थापनेमध्ये अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळेच न्यायालयीन लढाईच्या पार्श्वभूमीवर या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याचं सांगण्यात येत आहे.मागील दोन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु असणाऱ्या सुनावणीदरम्यान शिंदे गटातील आमदारांची अपात्रता, विधानसभा उपाध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्ताव, शिंदे गट आणि शिवसेनेने बदलेला विधानसभेतील गटनेता, मुख्य प्रतोद या विषयांवर दोन्ही बाजूने युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने काही निर्देश देत सुनावणी आठ ऑगस्ट रोजी होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय सल्ला मसलत करण्यासाठी फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याचं सांगितलं जात आहे. येत्या काही दिवसांमध्ये राज्यात मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चाही सुरु आहे.

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होईल असं बुधावारीच स्पष्ट केलं आहे. या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवरही महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी फडणवीस दिल्लीला गेल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.१५ ऑगस्ट रोजी राज्यभरामध्ये स्वातंत्र्य दिनाच्यानिमित्ताने राज्यातील जिल्ह्यांमध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र मंत्रीमंडळची स्थापना न झाल्याने आणि पालक मंत्र्यांची नियुक्ती न करण्यात आल्याने या कार्यक्रमांमध्ये झेंडावंदनासारख्या सामान्य गोष्टींसंदर्भातील संभ्रमही निर्माण होण्याची शक्यात आहे. याच पार्श्वभूमीवर लवकरात लवकर मंत्रीमंडळाची स्थापना आणि पालकमंत्र्यांची नियुक्तीला प्राधान्य दिलं जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याच साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर फडणवीस हे सल्ला मसलत करण्यासाठी दिल्लीला रवाना झाल्याचं सांगितलं जातंय.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *