सत्ताबदल होताच राणा दाम्पत्याचा ‘अ‍ॅटिट्यूड’ बदलला; पोलिसांकडून जामीन रद्द करण्याची मागणी

अतुल परदेशी
मुख्य संपादक
०५ ऑगस्ट २०२२


हनुमान चालीसा प्रकरणात जामीनावर सुटका झालेले खासदार नवनीत राणा आणि रवी राणा हे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. सरकारी पक्षाने गुरुवारी विशेष न्यायालयात राणा दाम्पत्याच्या नावाने अजामीनपात्र वॉरंट बजावण्याची मागणी केली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याला पुन्हा एकदा अटक होणार का, या चर्चेने जोर धरला आहे. राज्यात सत्ता बदल झाल्यापासून राणा दाम्पत्य न्यायालयीन प्रक्रियेबाबत गंभीर नाहीत, असा दावा सरकारी पक्षाने केला आहे. न्यायालयाने जामीन मंजूर करताना या प्रकरणावर राणा दाप्मपत्याने कोणतेही भाष्य न करण्याची अट घातली होती. परंतू राणा दाम्पत्याने त्या अटीचे उल्लंघन केल्याचा दावा करत पोलिसांनी दोघांचा जामीन रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे.या अर्जावर राणा दाम्पत्यातर्फे गुरुवारी युक्तिवाद करण्यात येणार होता. परंतु ते दोघे किंवा त्यांच्यावतीने युक्तिवाद करणारे वकील न्यायालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे राणा दाम्पत्य हे न्यायालयीन प्रक्रियेबाबत गंभीर नसल्याचे सांगत त्यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावण्याची मागणी विशेष सरकारी वकिलांनी केली.

राज्यातील बदललेल्या राजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर दोघेही न्यायालयीन प्रक्रियेबाबत गंभीर नाहीत. त्यांना आता कोणीच काही करू शकत नाही, असा त्यांचा समज झाला आहे. राणा दाम्पत्याला न्यायालयाचाही आदर राहिलेला नाही, असा आरोप सरकारी वकिलांनी केला.मुंबई पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांना २३ एप्रिल रोजी अटक केली होती. राणा दाम्पत्यानं उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान मातोश्रीमध्ये हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली होती. यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली होती. नवनीत राणा आणि रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी कलम १५३ अ या कलमाचा वापर करत अटक केली होती. समाजामध्ये धर्म, प्रांत, भाषा या मुद्यांच्या आधारे शत्रूत्व पसरवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. अखेर १४ दिवसांनी त्यांना जामीन मिळाला होता.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *