मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अनिश्चितता ; तयारी पूर्ण; पण न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा

अतुल परदेशी
मुख्य संपादक
०५ ऑगस्ट २०२२


राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार शुक्रवारी करण्याची तयारी करण्यात आली असली तरी शिवसेनेतील फुटीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सोमवारच्या निर्णयानंतरच विस्तार केला जाईल, असे उच्चपदस्थ सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्ताराबाबत अनिश्चितता कायम असून आज, शुक्रवारी विस्तार होण्याची शक्यता नाही. न्यायालयाच्या निकालानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चिन्हे आहेत.मंत्रिमंडळ विस्ताराबाबत गेले काही दिवस भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेत्यांकडून वेगवेगळय़ा तारखा सांगितल्या जात आहेत.

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी रविवापर्यंत विस्तार होईल, असे सांगितले होते. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी १५ ऑगस्टपूर्वी विस्तार होईल, असा दावा केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या सुनावणीत निर्णय होण्याची अपेक्षा होती. त्यामुळे विस्तार शुक्रवारी करण्याची तयारी राजभवनवर ठेवण्यात आली. त्यासाठी सर्व यंत्रणा गुरुवारी कार्यरत होत्या. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे शनिवारी नवी दिल्लीला जाणार आहेत. पण न्यायालयाने पुन्हा सोमवारी सुनावणी ठेवली असून त्यावेळी अंतरिम आदेश दिला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर भाजप पक्षश्रेष्ठींकडून विस्ताराबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. गेले महिनाभर रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार शुक्रवारी होण्याची शक्यता वर्तविली जात होती.

शासकीय यंत्रणांनी तशी तयारीही केली होती. पण विस्तार शुक्रवारी होणार नाही, असे सूत्रांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेतील फुटीवर पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. त्यानंतरच विस्तार होण्याचे आता जवळजवळ पक्के होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिवसभराचे नियोजित कार्यक्रम रद्द करून नवी दिल्लीत गेल्याने विस्ताराची चर्चा सुरू झाली. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला. यामुळे मुख्यमंत्र्यांनीही त्यांचे दिवसभराचे सारे कार्यक्रम रद्द केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *