ज्या माणसाने नगरविकास मंत्री असताना हा निर्णय घेतला त्यानेच बेकायदेशीर मुख्यमंत्री म्हणून…”; आदित्य यांची टीका

अतुल परदेशी
मुख्य संपादक
०५ ऑगस्ट २०२२


२०१७ च्या प्रभाग रचनेनुसार चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याच्या शिंदे सरकारच्या निर्णयावर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी कठोर शब्दांमध्ये टीका केलीय. गुरुवारी मुंबईमधील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना आदित्य यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच बंडखोर आमदारांवर आणि खासदारांना लक्ष्य केल्याचं पहायला मिळालं.चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला असून त्यासंदर्भात प्रश्न विचारला असता आदित्य यांनी, “खरे मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलाय,” असा टोला लगावला.

महाविकास आघाडी सरकारने गेल्या वर्षी तीन सदस्यीय प्रभाग रचना लागू केली होती. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने महापालिकांमध्ये पुन्हा चार प्रभाग पद्धत लागू केली. तसेच २०१७च्या प्रभागांच्या संख्येनुसारच महापालिकांची निवडणूक घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषदांमध्ये किमान ५०, तर कमाल ७५ सदस्य संख्या ठेवण्यासाठी कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचसंदर्भात आदित्य यांना पत्रकारांनी “प्रभाग रचना बदलण्यात आलीय. सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनीच निर्णय घेतला होता. मात्र नऊ वॉर्ड मुंबईत वाढवण्यात आलेले हे बेकायदेशीररित्या वाढवले असं त्यांनी सांगितलंय,” असा संदर्भ देत प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य यांनी, “मला वाटतं की दोन लोकांच्या बेकायदेशीर सरकारला लाखो लोकांचं भवितव्य अवलंबून असणारा हा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का हा पहिला प्रश्न आहे,” असा टोला लगावला.“दुसरा प्रश्न ज्या माणसाने नगरविकास मंत्री असताना हा निर्णय घेतला त्यानेच बेकायदेशीर मुख्यमंत्री म्हणून हा निर्णय बदलला. या सरकारमध्ये खरा मुख्यमंत्री कोण आहे हा लोकांना प्रश्न पडलाय. खरी ताकद कोणाकडे आहे हा प्रश्न लोकांना पडलाय,” असंही आदित्य म्हणाले.

आदित्य यांनी हे बंडखोर नेते निवडणुकीला सामोरे जायला घाबरत असल्याची टीका केली. “वॉर्डच्या आरक्षण सोडतीची घोषणा परवा झाली. हे जे ४० गद्दार आहेत. त्यांना सगळीकडेच म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आणि महानगरपालिकेत पण निवडणुकीला सामोरे जायला भीती वाटतेय. भीती नसती तर स्वत: राजीनामा दिला असता आणि निवडणुकीला सामोरे गेले असते. त्यांना भीती याच गोष्टी आहे की जनतेला कळलंय की त्यांनी प्रमाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. हे जनतेला आवडलेलं नाही,” असं आदित्य म्हणाले“भरत गोगावले म्हणतायत पुन्हा निवडणुका घ्या. आम्ही शांत आहोत म्हणजे घाबरलेले आहोत असा अर्थ नाही,” असं म्हणत पत्रकाराने आदित्य यांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना आदित्य यांनी, “धमकी आणि गुंडगिरीचा जमाना गेलेला आहे. मी पण हेच म्हणतोय की राजीनामे द्या आणि निवडणुका घ्या. यांच्यात हिंमत नाहीय. यांना लाज उरली नाहीय. हिंमत असती आणि मतदारसंघ तसेच जनता यांच्या मागे उभी असती तर ते निवडणुकीला सामोरे जायला घाबरले नसते,” असं म्हटलं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *