पनवेलमध्ये मनसेला मोठं खिंडार, तब्बल १०० पदाधिकाऱ्यांचा एकनाथ शिंदे गटात प्रवेश

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०४ ऑगस्ट २०२२


राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाला मोठा धक्का बसला. कारण, पक्षातून मोठ्या संख्येनं नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचा हात धरला. आता मनसेलाही या सत्तांतराचा मोठा धक्का बसला आहे. पनवेलमध्ये राजकीय भूकंप झाला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खिंडार पडले आहे.आज पनवेल, उरणमधील नाराज मनसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला हा राज ठाकरे यांना धक्का मानला जात आहे. अंतर्गत राजकीय वादामुळे मनसैनिकानी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याचे समजते. पनवेलमधील मनसेचे माजी रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत, माजी खारघर शहर अध्यक्ष प्रसाद परब , यांच्यासह उरण तालुका उपाध्यक्ष, विभाग अध्यक्ष, शाखाध्यक्ष, कामगार सेनामधील पदाधिकारी, उपशहर प्रमुखसह पूर्ण मनसे खारघर मलबार हिल येथील नंदनवन बंगल्यात एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत शिंदे गटात पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.

पनवेल, उरण मधील मनसेच्या एकूण १०० पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला.आमच्यानंतर आणखी मनसैनिक एकनाथ शिंदे गटात प्रवेश करतील ही यादी वाढतच राहणार आहे असंही यावेळी अतुल भगत यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं. तसेच मनसे नेते अमित ठाकरे यांचे स्विय सहाय्यक महेश ओवे यांचा पनवेल महानगर पद नियुक्तीमधील वारंवार हस्तक्षेप, स्थगिती याला कार्यकर्ते कंटाळले असल्याचे माजी खारघर शहर अध्यक्ष प्रसाद परब यांनी सांगितलं.पनवेलमध्ये काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत दोन गट पहायला मिळत होते. मात्र, अंतर्गत होणारा वाद आणि वारंवार होणारे खच्चीकरण यामुळे आम्ही बाहेर पडत असल्याचेही कार्यकर्त्यांनी सांगितले. याआधीसुद्धा पनवेलमधील शिवसेनेचे महानगर प्रमुख रामदास शेवाळे, रायगड जिल्हा सचिव रुपेश पाटील, उपशहर प्रमुख मंगेश रानवडे, उपशहर प्रमुख इम्तियाज शेख यांच्यासह अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *